चंद्रपूर : नक्षलवाद ही चळवळ नसून ते देशविघातक बंड आहे. बंड शमविण्यासाठी सर्व भारतीयांनी सावधतेने लढणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लोकमत नागपूर आवृत्तीचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले. सर्वोदय शिक्षण मंडळ द्वारा संचालित सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क, पडोली व विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत ‘नक्षलवाद, आदिवासी विकास व शासकीय धोरण’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र पार पडले. या चर्चासत्रात ते बोलत होते. चर्चासत्राचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री तथा सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शांताराम पोटदुखे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार, ज्येष्ठ पत्रकारदेवेंद्र गावंडे, आयोजक प्राचार्य डॉ. सुनिल साकुरे, चर्चासत्राचे समन्वयक प्रा. सुभाष गिरडे उपस्थित होते.प्रा. द्वादशीवार यांनी नक्षलवाद चळवळीचा इतिहास मांडून व घडामोडीचा आढावा सादर केला. त्यांनी सध्यास्थितीत घडलेल्या गोविंद पानसरे यांच्या हत्याकांडाविषयी चिंता व्यक्त केली. शांताराम पोटदुखे यांनी चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्ह्याने निसर्ग संपत्ती, जंगल, कोळसा खाणी इत्यादी धनसंपदा देशाला दिले आहे. या जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, वीज या सुविधा शासनाने पुरविण्यास प्रयत्न केला. परंतु आदिवासी समाजाला रोजगार व आधुनिक तंत्रज्ञानाचा अभावामुळे समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे चर्चासत्रातून काही उपाययोजना आखता आल्यास चर्चासत्राचे फलीत होईल, असे सांगितले. संचालन प्रा. नरेंद्र टिकले यांनी केले. तर आभार प्रा. सुभाष गिरडे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
नक्षलवाद ही चळवळ नसून बंड
By admin | Updated: March 6, 2015 01:12 IST