निवासी डॉक्टरची मागणी : उपचाराविना परतात पशुपालक नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या नवरगाव येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र इमारत पुर्णत: पडलेली आहे. तसेच या ठिकाणी निवासी डॉक्टर नसल्याने जनावरांवर उपचार कोण करणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. नवरगाव येथील लोकसंख्या १५ हजारच्या आसपास असून येथे शेकडो शेतकरी आहेत. शिवाय आजुबाजुला अनेक खेडेगाव गाव आहेत. या ठिकाणी कुरमार समाज मोठ्या प्रमाणात असून पिढ्यानपिढ्या शेळी-मेंढी पालन व्यवसाय केल्या जातो. त्यामुळे आजही हजारो शेळ्या-मेंढया आहेत. शिवाय हजारो गुरे-ढोरे आहेत. माणसाप्रमाणे जनावरांनाही औषधोपचार मिळाला पाहिजे, यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना निर्माण करण्यात आला असून दवाखाना श्रेणी एक मध्ये आहे. सध्या पावसाळा सुरू झाला असून माणसाप्रमाणे जनावरांवर सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव जाणवतो. मात्र या ठिकाणी प्रभारी डॉक्टर आहे. २००८-१० मध्ये या ठिकाणी निवासी डॉक्टर राहून जनावरांवर उपचार करायचे. मात्र नंतर २०११ पासून या ठिकाणी डॉ. पराग खोब्रागडे नियुक्त झाले. दवाखान्याची इमारत जुनी असल्याने तसेच निवासी इमारत सुद्धा जुनी असल्याने ते ये-जा करीत होते. अलीकडे दवाखान्याची इमारत कवेलु फाट्यासह पडलेली आहे. त्यामुळे तेथील औषधीसाठा व इतर साहित्य निवासी इमारतीमध्ये हलविण्यात आले आहे. निवासी इमारत सुद्धा धोकादायक असून राहण्यासारखी नाही. डॉ. खोब्रागडे यांची बदली झाली. त्यामुळे काही दिवस डॉक्टरविना दवाखाना सुरू होता. या प्रकाराला कंटाळून शेतकऱ्यांनी आपली जनावरे घेऊन कुळमेथे यांच्या नेतृत्वात दवाखान्यावर मोर्चाही काढला होता आणि टाळे लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पुन्हा प्रभारीच्या खांद्यावर पुन्हा प्रभार सोपविला आहे. त्यांच्याकडे सिंदेवाही, गिरगाव आणि नवरगावचा प्रभार असून मधल्या काळामध्ये २ महिने डॉ. आव्हारी आल्या होत्या. मात्र पुन्हा तिच परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रभारी असल्याने डॉक्टर कधी येतात आणि जातात, याचा शेतकऱ्यांना पत्ताही लागत नाही. त्यामुळे आजारग्रस्त जनावरांवर उपचार कोणाकडून करावा, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतत भेडसावत आहे. दवाखान्याची इमारत बांधण्याकरिता ३६ लाखांचे इस्टीमेट तयार करून मंजुरीला पाठविले आहे. ते केव्हा मंजुर होणार आणि प्रत्यक्ष इमारत कधी बांधुन होणार हा एक प्रश्नच आहे. त्यामुळे नवरगावला निवासी पशुवैद्यकीय अधिकारी द्यावा व येथील दवाखान्याची नवीन इमारत, निवासी इमारत लवकर बांधुन तयार करण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना जनावरांवर उपचार करता येईल, यासाठी संबंधीत विभागाने तातडीने पावले उचलली, अशी मागणी परिसरातील पशुपालकांकडून होत आहे. (वार्ताहर)
इमारतीअभावी नवरगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचा कारभार खोळंबला
By admin | Updated: August 5, 2016 00:57 IST