कोविड नियमांचे उल्लंघन.
कोविड नियमांचे पालन करा, घरी सुरक्षित रहा, बाहेर फिरू नका, संचार बंदी आहे, अशा अनेक सूचना नांदा ग्रामपंचायतीने दिल्यावरही अनेक जण विनाकारण सर्रास फिरत आहेत.
चाचण्या करण्यास टाळाटाळ
स्थानिक डॉक्टरांकडे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे; मात्र नागरिक कोरोना चाचण्या करण्यास घाबरत असून, टाळाटाळ करीत आहेत. येथील अनेक व्यावसायिकांनी कोविड चाचण्या केलेल्या नाहीत, तरीही बिनधास्त व्यापार सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
कोविड उद्रेक होण्याची शक्यता
कोरोना बाधित अनेक जण गृहविलगीकरणाचे नियम पाळत नसल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबांना कोविडचा संसर्ग झाला आहे. कुटुंबातील व्यक्तीसुद्धा इतरत्र बाहेर फिरत असल्याने कोविड उद्रेक होण्याची शक्यता बळावली आहे.
आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष
परिसरात १५० च्या वर नागरिकांना लागण झाली असली तरी मात्र आरोग्य यंत्रणेचे कमालीचे दुर्लक्ष झालेले परिसरात दिसून येत आहे.
लागूनच असलेल्या सिमेंट उद्योगामध्ये बाहेर राज्यातील जड वाहने येणे-जाणे सुरू आहे. जड वाहने घेऊन येणाऱ्या चालक व सहायक परिसरात भटकताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचीसुद्धा चाचणी करूनच त्यांना कंपनी प्रशासनाने आत घ्यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.