सुंदर शहरासाठी धडपड: पोंभुर्णा शहरवासीयांकडून अपेक्षा पोंभुर्णा : पोंभुर्णा शहर हे स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावारुपास यावे, यासाठी नगरपंचायत प्रयत्नरत आहे. नगरपंचायतीचे अध्यक्ष गजानन गोरंटीवार यांना स्वच्छ व सुंदर पोंभुर्णा शहराचा ध्यास लागलेला आहे. त्यासाठी शहरवासीयांनी सहकार्य करुन सुंदर पोंभुर्णा शहराच्या निर्मितीत आपले योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. शहरातील नागरिकांना वीज पाणी व रस्ते तथा भौगोलीक सुविधा पुरविणे हे नगरपंचायतीचे काम आहे. परंतु या पलीकडे जावून शहराच्या सुंदरतेचा ध्यास मनात बाळगून त्या दिशेने सक्रिय पाऊल टाकणारे नगर पंचायत प्रशासन आपल्या आगळ्या- वेगळ्या कामाने शहरात कौतुकाचा विषय झालेले आहे. स्वच्छ पोंभुर्णा शहर ठेवण्यासाठी नगरपंचायतीने सहा घंटागाडीची व्यवस्था केली असून त्याद्वारे प्रत्येक प्रभागातील कचरा जमा करुन घटांगाडीद्वारे गावाबाहेर विल्हेवाट लावली जात आहे. त्यामुळे परिसरातील रस्त्यावरील कचऱ्याचे प्रमाण कमी होवून शहरातील सार्वत्रिक घाण कमी होण्यास मदत होत आहे तर पर्यावरणाचा समतोल साधण्याच्या दृष्टीने आणि शहरातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी शहरामध्ये एक हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक वृक्षाला संरक्षण कठडे बसविण्यात आली असून प्रत्येक वृक्षाला दररोज पाणी देऊन त्यांचे योग्य संगोपन केले जात आहे. तसेच शहरात ५० मायक्रानपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टीक पिशव्यावर बंदी घालण्यात आली असून अशा प्लॅस्टिक पिशव्याऐवजी कागदी व कापडी पिशव्याचा पर्याय नगर पंचायतीने पुढे आणला आहे. या उपरांत कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे शहराच्या सुंदरतेकरिता प्लॅस्टिक निर्मूलनावर विशेष भर देण्यात येत आहे. आणि या बाबतीत नगर पंचायत सर्वसाधारण सभेत तसा ठरावही मंजूर करुन घेण्यात आला आहे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर न.प.ची वक्रदृष्टी असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर कमी झाले आहे. परिणामी अस्तव्यस्त फेकल्या गेलेले भोंगळवाणे प्लॅस्टिक दर्शन कमी होवून शहराच्या सौंदर्यात भर पडेल, असा नागरिकांना विश्वास आहे. नगर पंचायत अध्यक्ष गजानन गोरंटीवार स्वत: शहराची सुंदरता गांभीर्याने घेऊन विविध सामाजिक संस्था व कार्यकर्त्याशी संपर्क ठेऊन असल्याची माहिती आहे.त्यांच्या या प्रयत्नाला यश आल्यास पोंभुर्णा शहर स्वच्छ व सुंदर होईलच. (तालुका प्रतिनिधी) स्वच्छ व सुंदर पोंभुर्णा शहर अशी या शहराची ओळख निर्माण होवून या शहराचा नावलौकींक वाढविण्यास आपण कटीबद्ध आहोत. यात संपूर्ण न.प. सदस्य सहकार्य करीत असून आपण नागरिकांमध्ये जागृती निर्माण करुन व प्रसंगी कठोर कारवाई करुन आपल्या कारर्कीदीत हे शहर स्वच्छ व सुंदर बनवू अशी आशा आहे. नागरिकांनी या कामात सक्रीय सहकार्य करुन आपले शहर स्वच्छ ठेवावे. -गजानन गोरंटीवार, न.प. अध्यक्ष, पोंभुर्णा
नगरपंचायतीने घेतला स्वच्छ व सुंदरतेचा ध्यास
By admin | Updated: December 30, 2016 01:34 IST