जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जनसमस्यांकडे बल्लारपूरवासीयांना वेधले लक्षबल्लारपूर : बल्लारपूरवासीयांच्या जल, जमीन, आरोग्य या व इतर जीवनावश्यक काही समस्या आहेत. याबाबत स्थानिक पातळीवर निवेदन, मोर्चा, चर्चा सारे उपाय झालेत. आश्वासनांशिवाय फारसे मिळाले नाहीत. आता पुढचा उपाय म्हणून बल्लारपूर शहर विकास आघाडीने येथून जनतेचा पायी मोर्चा काढला व चंद्रपूरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकून समस्यांचे निवेदन तत्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांना दिले.हा पायी मोर्चा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत थुलकर, जैनुल आबेदिन उर्फ बाबाभाई यांच्या नेतृत्वात नगर परिषद चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पमाला वाहून, या विभूतींना अभिवादन करुन चंद्रपूरच्या दिशेने निघाला.यात महिलांची संख्या लक्षणीय होती. अप्पर जिल्हाधिकारी धिवरे यांनी निवेदन स्विकारत शिष्टमंडळाशी समस्यांबाबत चर्चा केली आणि बायपास रोड मंजूर करण्याबाबत तसेच पेपर मिलपासून होणारे जल आणि वायू प्रदूषण संबंधित विभागाशी चर्चा करुन लवकर कारवाई करु, असे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात भारत थुलकर, बाबाभाई यांच्यासह संजय डुंबेरे, अरुण लोखंडे, जयसंवत सिंग, ठाकूर, अहेसान खान, आसिफ खान, मुन्ना दिगवा, शिलकुमार तिरपुडे, शालिनी वावरे, रेखा मेश्राम, सतीश कनकम, ताई फुलझेले आदींचा समावेश होता. यानंतर झालेल्या सभेत भारत थुलकर, अंकुश वाघमारे, जी. के. उपरे, खुशाल तेलंग, किशोर पोतनवार, सोनी आदींची भाषणे झालीत. या समस्या लवकर निकालात न निघाल्यास जेल भरो व बल्लारपूर बंद आंदोलन करु, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी यावेळी दिला. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारपूर ते चंद्रपूर काढला मोर्चा
By admin | Updated: February 8, 2016 00:57 IST