वरोरा : प्राचीन काळापासून आदिवासी गोंडीयन जनतेचे गोंडी धर्माचे आराध्य दैवत जैतूर व सप्तरंगी ध्वज कुठल्याही प्रकारची समाजाला सूचना न देता रेल्वे अधिकाऱ्यांनी उखडून फेकल्याचा आरोप गोंडवाना गणतंत्र पार्टीने केला आहे. या घटनेला जवाबदार असलेल्या आय. एम. ओ. चतुवेर्दी व पी. डब्लू. आय. सिंग या दोन रेल्वे अधिकाऱ्यांवर फौजदारी व अट्रॉसिटी अन्वये गुन्हा नोंद करून तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी गोंडवाना गणतंत्र पार्टी व आदिवासी संघटनांचा निषेध मोर्चा आज गुरुवारी दुपारी १ वाजता उपविभागीय कार्यालयावर धडकला. १ मार्च २०१७ रोजी सकाळी १० वाजताची घटना असून मौजा वरोरा येथील सुधीर दादाजी कोवे हे आपल्या कामानिमित्त्य या धार्मिक स्थळापासून जात असताना त्यांना या धार्मिक स्थळाची रेल्वे अधिकाऱ्यांकडून विटंबना होत असल्याचे दिसून आले. समाजबांधवांनी रेल्वे अधिकारी चतुर्वेदी यांना विचारणा केली असता सादर धार्मिक स्थळाची जागा ही रेल्वे प्रशासनाची आहे म्हणून आम्ही उफडून फेकले, असे उलट उत्तर दिले. घटनास्थळावरील दुसरे रेल्वे अधिकारी पी. डब्लू. आय. सिंग यांनी उपस्थित आदिवासींना शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. दरम्यान, मोर्चा काढण्यासाठी समाजबांधवांनी रितसर परवानगी मागितली असता त्यांना संबंधित विभागाकडून परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विलास नामदेव परचाके यांनी केला आहे. (शहर प्रतिनिधी)
गोंडवाना गणतंत्र पार्टीचा एसडीओ कार्यालयावर मोर्चा
By admin | Updated: March 24, 2017 00:49 IST