वरोरा : वरोरा तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून शहर कोरोनाचे हॉटस्पॉट झाल्याची स्थिती आहे. अशातच काही विघ्नसंतोषी व्यक्ती वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करीत असल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यांचा बंदोबस्त करणार असल्याचे वरोऱ्याचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी सांगितले.
वरोरा तालुक्यात आदिवासी वसतिगृहात १२५ रुग्ण क्षमतेचे व माता महाकाली पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दोनशे रुग्ण क्षमतेचे कोविड सेंटर सुरू केले आहे. ट्रॉमा केअर येथे १८ प्राणवायू खाटा असलेले ७० रुग्ण क्षमतेचे रुग्णालय सध्या सुरू आहे. त्याचबरोबर क्षमतेपेक्षा जास्त आरटीपीसीआर तपासण्या करण्यात येत आहेत. या ठिकाणी कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात तणावाखाली असूनही स्वतः बाधित होण्याचा धोका निर्माण झाला असतानासुद्धा अविरत कार्य करीत आहेत, अशी माहिती बेडसे यांनी दिली.
मात्र काही स्वयंघोषित पुढारी, स्वतःला स्वयंसेवक म्हणवणारे परंतु सेवेचा भाव वागण्या- बोलण्यात कुठेही नसणारे कर्तव्यावर असणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत विनाकारण वाद घालीत आहेत. अविरत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा प्रयत्न ते करीत असून अशा विघ्नसंतोषी व्यक्तींनी स्वतः वर नियंत्रण आणावे, अन्यथा कायद्यात उपलब्ध सर्व साधनांचा वापर करून त्यांच्या कायम लक्षात राहील, असा बंदोबस्त करण्यात येईल,असे तहसीलदार यांनी स्पष्ट केले आहे.