उड्डाण पुलाचे अस्तित्व धोक्यात
चंद्रपूर : वरोरा नाका परिसरात असलेल्या उड्डाण पुलावर वृक्ष उगवल्यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.सदर पुलावरील झाड तोडण्याची मागणी करण्यात आली आहे.मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चेंबर ठरताहेत धोकादायक
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी उघडे चेंबर आहेत. हे चेंबर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे दुरुस्तीची मागणी केली जात आहे. काही महिन्यामध्ये पावसाचे दिवस येणार आहे. या दिवसामध्ये उघड्या चेंबरमुळे अपघाताची शक्यता आहे.
भंगार वाहनांचा लिलाव करावा
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील विविध कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने आहे. मात्र या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे जागा रिकमामी करावी, अशी मागणी केली जात आहे.
वडगाव परिसरात भरतोय भाजी बाजार
चंद्रपूर : येथील वडगाव परसरातील काही रस्त्यावर शेजारील गावातून येणारे शेतकरी भाजीपाला विक्री करतात. मात्र त्यांना बसण्यासाठी योग्य जागाच नाही. या व्यावसायिकांनी महापालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
अंचलेश्वर गेटची डागडुजी करावी
चंद्रपूर : येथील अंंचलेश्वर गेट तसेच परिसराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने लक्ष देवून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी इतिहास प्रेमींनी केली आहे.
एटीएम केंद्राची स्वच्छता करावी
चंद्रपूर : शहरात विविध बॅंकांनी एटीएम केंद्र सुरु केले आहे. काही एटीएमची नियमित स्वच्छता होत असली तरी काही केंद्रात कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळत आहे. त्यामुळे या केंद्राची नियमित तपासणी करून ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
बांधकाम व्यावसायिक धास्तावले
चंद्रपूर : मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले असून शासनाने नवीन नियमावली जाहीर केली आहे. परिणामी बांधकाम व्यवसाय अडचणीत येण्याची शक्यता असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
उड्डाणपुलावरील माती उचलावी
चंद्रपूर : शहरामध्ये चार ते पाच उड्डाण पुल आहे. मात्र या पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे पाहिजे तसे लक्ष नाही. परिणामी पुलावर मोठ्या प्रमाणात मातीचा थर साचला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाणपोई सुरु करावी
चंद्रपूर: मागील काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणपोई सुरु व्हायच्या. यावर्षी अद्यापही चौकाचौकात पाणपोई सुरुच झाल्या नाही. परिणामी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
शहराचे विद्रुपीकरण सुरुच
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून शहरातील चौकाचौकात मोठमोठे बॅनर लावले जात आहे. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. काही दिवसापूर्वी महापालिकेने यासंदर्भात कडक कारवाईचा निर्णय घेतला. मात्र तो निर्णय हवेतच विरला आहे.