घुग्घूस : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रस्ता बांधकामात कंत्राटदाराने चक्क ग्रामपंचायत मजुरांना लावल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उघडकीस आला. या प्रकाराची एका ग्रामपंचायत सदस्याने तक्रार केली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रातील रस्ता मंजूर झाला आहे. साडेतीन लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या रस्त्याचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र सदर कंत्राट एका ग्र्रामपंचायत सदस्याने दुसऱ्याच्या नावाने घेतल्याचे बोलल्या जात आहे. यातून ग्रामपंचायतच्या मजुरांना या कामाला लाऊन मजुरी वाचविण्याचा प्रकार सुरु आहे. यामुळे गावातील अन्य कामामध्ये मजुर जात नसल्याने गावात समस्या वाढल्या आहे. विशेष म्हणजे, घुग्घूस ग्रामपंचायत महिन्याकाठी अडीच लाख रुपये या मजुरांच्या वेतनावर खर्च करीत आहे.ग्रामपंचायत हद्दीत विविध वार्डात सिमेंट कांक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. एका कंत्राटदाराच्या नावाने बील काढून ग्रामपंचायत सदस्य सदर काम करीत असल्याचा प्रकार मागील काही वर्षापासून सुरु आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्यामुळे सदर प्रकाराबाबत कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. बुधवारी सकाळी रस्त्याचे काम सुरु असताना या कामावर ग्रामपंचायतीचे मजुर काम करताना अनेकांना दिसून आले. त्यांना विचारपूस केली असता ग्रामपंचायतीचे मजुरांना कामाला लावल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीकडून सुरु असलेले विविध काम केवळ एकाच कंत्राटदाराकडून केल्या जात असून एकाच कंत्राटदाराकडून बील उचलल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यच अप्रत्यक्षपणे कंत्राट घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांमध्ये केला जात आहे.या ग्रामपंचायतमध्ये ३५ ते ४० मजूर आहे. त्यांच्यावर दरमहिन्याला २ लाख ५० हजार रुपये मजुरीच्या स्वरुपात दिले जाते. मात्र काही मजुरांना कंत्राटदारामार्फत कामाला लावले जात असल्याने मजुरांचा पाहिजे तिथे वापर होत नाही. यामुळे ग्रामपंचायतीवर आर्थिक भुंर्दड बसत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य गणेश उईके यांनी ग्रामसेवकाकडे तक्रार केली असून कंत्राटदाराकडे असलेल्या मजुरांवर खर्च करण्यात आलेला पैसा वसुल करून चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
कंत्राटदाराकडून ग्रामपंचायत मजुराचा दुरुपयोग
By admin | Updated: March 26, 2015 00:55 IST