नोकरी द्या : खाणीचा रस्ता अडविलालोकमत न्यूज नेटवर्कदुर्गापूर: वेकोलिने भटाळी गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या. याला एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटून गेला. मात्र त्या बदल्यात काहींना अद्यापही नोकऱ्या न दिल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी आज शुक्रवारी सकाळी खाण बंद आंदोलन केले. विस्तारित खाणीचा रस्ता अडवून वेकोलि व्यवस्थापनाला धारेवर धरले.भटाळी गावालगत वेकोलिची खुली कोळसा खाण आहे. या खाणीच्या विस्ताराकरिता वेकोलिने येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या आहेत. त्या बदल्यात वेकोलिने त्यांना मोबदला दिला व काही लोकांना नोकऱ्याही दिल्या आहेत. मात्र उर्वरित प्रकल्पग्रस्तांना वेकोलि व्यवस्थापन क्षुल्लक कारणे पुढे करुन नोकऱ्या देण्यास टाळाटाळ करीत आहे. वेकोलिने शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित करुन एक वर्षापेक्षाही अधिक कालावधी उलटून गेला आहे. या जमिनींचा सातबाराही वेकोलिच्या नावावर झाला आहे. आता हे शेतकरी भूमिहीन झाले आहेत. शेतजमिनी नसलेला शेतकरी बेरोजगार झाला आहे. हे बेरोजगार युवक नोकरी मिळविण्याकरिता वेकोलिच्या कार्यालयात वारंवार चकरा मारीत आहेत. मात्र वेकोलि व्यवस्थापन त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. वेकोलिच्या या अडेलतट्टू धोरणाने संतप्त झालेल्या भटाळीतील प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांनी आज शुक्रवारी सकाळी ८ वाजता विस्तारित खाणीचा रस्ता अडवून धरला. त्यामुळे सामान्य पाळीतील कर्मचारी आपल्या कार्यस्थळी पोहचू शकले नाही. खाण बंद पडण्याची वेळ आली होती.
वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे खाण बंद आंदोलन
By admin | Updated: July 8, 2017 00:38 IST