चंद्रपूर : जिल्ह्यात रेती, गिट्टी, मुरुम व इतर गौण खनिज इत्यादी अवैधरित्या वहन होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहेत. गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या वाहनांचे पहिल्या तीन गुन्ह्यात निलंबन किंवा तडजोड शुल्क भरणे तर चवथ्या गुन्ह्यात परवाना रद्द करण्याचा निर्णय परिवहन विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.चंद्रपूर जिल्ह्यात परवानाधारक मालवाहू वाहनातून संबंधीत विभागाच्या परवानगी शिवाय रेती मुरुम, गिट्टी व इतर गौण खनिजाची वाहतूक करता येणार नाही, अशी अट परवान्यावर घालण्यात आली आहे. या अटी व शर्तीचा भंग केल्यास व अशा बाबतची प्रकरणे तहसीलदार तसेच खनिकर्म अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यास मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ८६ अंतर्गत परवाना निलंबित करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असून माल वाहू वाहनातून गौण खनिजाची वाहतूक करु नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक वाहनांवर प्रशासनाची नजर राहणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
गौण खनिज तस्करी; परवाना निलंबित होणार
By admin | Updated: July 4, 2015 01:42 IST