कंपनीने केला पोबारा : व्यवस्थापकासह १३ जणांवर गुन्हे दाखलचंद्रपूर : गुंतवणूकदाराच्या रकमेवर साडे पाच वर्षात दामदुप्पट रक्कम देण्यासह जीवनविमा देण्याच्या नावावर जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये साई प्रॉपर्टी डेलव्हपमेंट प्रा. लि. या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गंडविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. कंपनीच्या व्यवस्थापकासह तब्बल १३ कर्मचाऱ्यांवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.साईप्रकाश आर्गनिक फुड लि. या कंपनीने २०१३ मध्ये चंद्रपूर येथे साई प्रापर्टी डेव्हलपमेंट लिमिटेड या नावाने कार्यालय सुरू केले. चंद्रपुरात कंपनीने बंगाली कॅम्प मार्गावरील मच्छीनालाजवळ कार्यालय उघडले होते. या कार्यालयात काही स्थानिक कर्मचारीही कंपनीने नेमले. यानंतर जिल्हाभरात एजन्ट नेमून नागरिकांना साडेपाच वर्षात दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवत ठेवी ठेवण्यास भाग पाडले. अनेकांनी कंपनीच्या या आमिषाला बळी पडून साई प्रापर्टी डेव्हलपमेंट लिमिटेडमध्ये मोठ्या रकमा गुंतवल्या होत्या. अनेकांची गुंतवणूक ही लाखांच्या घरात असल्याचे सांगितले जाते.जिल्ह्यात कंपनीचे दोनशेवर एजन्ट असून हजार ते बाराशे गुंतवणूकदार असल्याची माहितीे आहे. कार्यालय नियमित सुरू असतानाच २०१५ मध्ये कंपनीने गाशा गुंडाळून पोबारा केला. यानंतरही काही कर्मचारी कार्यालय बंद झाल्याची माहिती दडवून ठेवत गुंतवणूकदारांकडून आणि एजन्टकडून रकमा गुंतवणूक केल्या जात होत्या. दरम्यान, गुंतवणूकदार कार्यालयात आल्यानंतर त्यांना कार्यालय बंद दिसले. त्यांनी चौकशी केल्यानंतर कार्यालय बंद झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली.दरम्यान, यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील चिखलगाव येथील सविता कातकडे या महिलेचेही ८३ हजार रुपये कंपनीने गंडविले. सविता कातकडे यांनी स्वत:सह पती आणि मुलाच्या नावाने साडेपाच वर्षासाठी रक्कम फिक्स डिपाझिट केली होती. शिवाय अन्य परिचयातील काही नारिकांनाही साईप्रकाशमध्ये रक्कम गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांच्या परिचयातील नागरिकांनी साईप्रकाशमध्ये २७ लाखांच्यावर रक्कम गुंतविली होती. तसेच जिल्ह्यातील एजन्टच्या माध्यमातून हजार ते बाराशे गुंतवणूकदारांनी येथे रक्कम गुंतवणूक केल्या आहेत. परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सविता कातकडे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात २ नोव्हेंबर रोजी कंपनी व्यवस्थापकासह १३ जणांविरोधात तक्रार दिली होती.कातकडे यांच्या तक्रारीच्या आधारे कंपनीचे व्यवस्थापक पुष्पेंद्रसिंग क्रिष्णप्रतापसिंग बघेल, दिलीपसिंग बघेल, चित्तरंजन मंडल, विलास उंदिरवाडे, हसमुख बांबोडे, ईश्वरसिंग गावंडे, मुकरु मांदाडे, छत्रपती वाळके, ओमप्रकाश सिंग, रेवनाथ वालदे, मनोहर गावंडे, अमझिरे, आदींविरोधात भादंवि ४२०, ४०६, ३४, पोटकलम ३, ४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय आस्थापनामधील हितसंबंधाचे रक्षण करण्याचे अधिनियम १९९९ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शनिवारी काही गुंतवणूकदार आणि एजन्ट्सनी रामनगर पोलीस ठाण्यात गर्दी केल्याने तणावाची स्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
गुंतवणूकदारांची कोट्यवधींनी फसवणूक
By admin | Updated: November 7, 2016 01:25 IST