चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झाला. त्यात पावसाने खोडा घातल्याने याचा पिकांवर परिणाम होत आहे. धानपट्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. सोयाबीन आणि कपाशीवर अशा वातावरणाचा परिणाम होत आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात धान, सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घेतले जाते. हंगामात १ लाख ६० हजार हेक्टरवर धान, १ लाख ४४ हजार हेक्टरवर सोयाबीन आणि १ लाख ३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली. यंदा समाधानकारक पाऊस पडेल, अशी आशा बाळगून शेतकरी कामाला लागले होते. मात्र पावसाने आपला रंग दाखविला. तब्बल दीड महिन्याने पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा पावसाचे दर्शन दुर्लभ झाले.आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. यामुळे रखडलेली शेतकामे आटोपण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला. आता तर, वातावरणात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान कमी-जास्त होत आहेत. त्यातच पावसाने खोडा घातल्याने याचा मोठा फटका पिकांना बसत आहे. विशेषकरुन धानपट्टयात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सध्या वाढीच्या अवस्थेत धान आहे. यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दमट वातावरणामुळे पाते गळण्याच्या मार्गावर आहेत. सोयाबीन दाणे आता भरत आहे. वातावरणामुळे दाण्याची वाढ खुंटण्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पोटॅशियम (००५०, १३०४५) या खाताची फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. (नगर प्रतिनिधी)
धानपट्ट्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव
By admin | Updated: September 24, 2014 23:28 IST