अभिमन्यू सोमाजी कोटनाके रा. पावना चक हे बँक ऑफ इंडिया सिंदेवाही येथून शेतीसाठी पीक कर्ज म्हणून ५० हजार रुपये घेऊन बँकेबाहेर निघाले. बँकेसमोरील पानठेल्याजवळ उभे असताना शेजारी असलेल्या दोन महिलांनी मोठ्या शिताफीने त्यांच्या हातातील थैलीला ब्लेडने चिरा मारला आणि त्यातील ५० हजार रुपये रोख रक्कम घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. ही बाब लक्षात येताच अभिमन्यू कोटनाके यांनी आरडाओरड सुरू केली. त्या ठिकाणच्या चौकात असलेल्या वाहतूक नियंत्रक पोलीस शरद सावसाकडे यांनी ही बाब कळताच त्यांनी पाेलिसांना सूचना दिली. क्षणाचाही विलंब न करता त्या महिलांचा पाठलाग करून त्यांना रस्त्यात थांबविले. लगेच महिला शिपाई दीक्षा रामटेके या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी महिलांची झडती घेतली असता ५० त्यांच्याजवळ हजार रुपये आढळून आले. आरोपी महिलांना पोलीस ठाण्यात आणून गुन्हा नोंद केला आहे. सिंदेवाही पोलिसांनी मध्य प्रदेशातील राजगड पोलिसांशी संपर्क साधला असता या महिला सराईत गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. अधिक तपास ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशीलकुमार सोनवणे करीत आहेत.
ब्लेडने चिरा मारून शेतकऱ्याचे ५० हजार रुपये पळविणाऱ्या मायलेकीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:51 IST