पोलिसांचा बंदोबस्त : कुठलीही अनुचित घटना नाही भद्रावती : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भद्रावती शहरातील अनधिकृत ठरविण्यात आलेली तीन धार्मिक स्थळे विकास आराखड्यातील रस्त्यात बाधीत होत असल्याने हटविण्यात आली. शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे भद्रावती नगरपालिकेद्वारे निरीक्षण करण्यात आले. त्यात न.प. क्षेत्रात एकूण ४९ अनधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली. त्यापैकी ४६ धार्मिक स्थळे नियमाधिन करण्यासाठी पात्र होती. तीन धार्मिक स्थळे विकास आराखड्यातील रस्त्यात बाधीत होत असल्याने हटविण्यात आली. नगरपालिकेद्वारे अतिक्रमण मोहीम हाती घेवून सुरक्षानगर बुद्ध विहाराच्या मागील बाजूस असलेले लहान नागोबा मंदिर, केसुर्ली वॉर्डातील केरोसीन डेपोच्या बाजूला असलेले गणेश मंदिर, बाजार वॉर्ड कांझी हाऊस समोरील दुर्गामाता मंदिर हे तीन मंदिर हटविण्यात आले. सदर अनधिकृत स्थळे स्थलांतरित करण्याबाबत व पर्यायी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत २२ डिसेंबर २०१६ रोजी न.प. विशेष सभेने मान्यता दिली होती. त्या अनुषंगाने ठाणेदार विलास निकम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात अतिशय शांततेत ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत सदर कारवाई करण्यात आली. मंदिराशी संबंधित असलेल्या भाविकांशी न.प. भद्रावतीने प्रथम चर्चा करुन त्यातून तोडगा काढून सदर कारवाई करण्यात आल्याचे मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी घेण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
भद्रावतीत तीन धार्मिक स्थळांचे स्थलांतरण
By admin | Updated: January 5, 2017 00:46 IST