लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नोंदणीकृत कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कंत्राटदाराकडून सुरक्षा पेटी (सेफ्टी किट) वाटप सुरू केले. मात्र, कंत्राटदार व त्यांच्या एजंटांनी वाटपाचे नियोजनच न केल्याने शेकडो कामगारांनी एमआयडीसीत बुधवारी (दि. २) रात्री वाहतूक रोखून तीव्र संताप व्यक्त केला.
बांधकाम क्षेत्रातील कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते. कामगार आर्थिकदृष्ट्या गरीब असल्याने त्यांच्याजवळ कुठलेच सेफ्टी किट उपलब्ध नसते. विकत घेणेसुद्धा शक्य नसते. त्यामुळे सेफ्टी किटशिवाय काम करत असतात. अशा वेळेस अपघात झाल्यास अपंगत्वाचा सामान करावा लागतो. प्रसंगी स्वतःचा जीवसुद्धा गमवावा लागतो. कामगारांच्या समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार पेटी योजना सुरू केली. चंद्रपुरातील कामगार कार्यालयाने व्यवस्थित नियोजन केले व संबंधित कंत्राटदारांच्या यंत्रणेने पात्र लाभार्थ्यांना पेटी वितरणाच्या सूचना दिल्या. पेटी वाटपाची मोहीम चंद्रपूरएमआयडीसी परिसरात संबंधित कंत्राटदारांकडून सुरू आहे. काहींनी यासाठी एजंट नियुक्त केल्याची चर्चा आहे. पात्र कामगारांची अधिकृत यादी असताना एजंटांनी भूलथापा देत असल्याचा आरोप महिला कामगारांनी केला. नियोजनानुसार पेटी होत नसल्याने पात्र कामगारांना डावलल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत शेकडो महिला पेटीसाठी ताटकळत होते; पण लाभ न मिळाल्याने अखेर वाहतूक रोखून तीव्र संताप व्यक्त केला.
कामगारांची मागणी काय ?कामगार विभागाने दिलेल्या नियमानुसारच सुरक्षा पेटी वितरण करावे. कंत्राटदारांनी एंजटांचा बंदोबस्त करावा. पात्र असलेला एकही कामगार लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
काय आहे सुरक्षा पेटीत ?बांधकाम कामगार पेटीत एकूण १३ वस्तू आहेत. त्यामध्ये बॅग, रिफ्लेक्टर, जॅकेट, सेफ्टी हेल्मेट, चार कप्प्यांचा जेवणाचा डबा, सेफ्टी बूट, सोलर टॉर्च, सोलर चार्जर, पाण्याची बॉटल, मच्छरदाणी जाळी, सेफ्टी बूट, हातमोजे, चटई, पेटी इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. हे सर्व साहित्य कामगारांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त असल्याने कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत कामगार एमआयडीसीत गुरुवारी देखील (दि. ३) मोठी गर्दी असल्याचे दिसून आले.
पेटीसाठी कोण आहेत पात्र?
- कामगार राज्याचा मूळ रहिवासी व १८ वर्षे ते ६० वर्षे वय असावे. कामगाराने मागील वर्षात २० दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे.
- कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी बंधनकारक आहे. वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आत बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभघेत असेल तर अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेच्या लाभदिला जात नाही, अशी माहिती प्रशासनाने दिली.