कोठारी: येथून आठ किमी अंतरावर असलेल्या परसोडी येथील स्वस्त धान्य दुकानदार गावकऱ्यांना धान्य देण्यासाठी त्रास देत असून जादा पैसे वसुल करीत, केरोसीन वाहनचालकांना विकण्याची तक्रार गोंडपिपरी तहसीलदारांकडे करण्यात आली. दुकानदारांची चौकशी करुन कारवाई करण्यापेक्षा त्याला वाचविण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याची तक्रार गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.स्वस्त धान्य वितरक तसेच केरोसीन विक्रेता सुरेंद्र मत्ते यांचेकडे परवाना २०-२५ वर्षापासून आहे. मात्र ते या माध्यमातून गावकऱ्यांना वेठीस धरुन त्रस्त करीत आहे. धान्य वाटप करताना गटबाजी करणे, शिविगाळ करणे, धमकावणे, कार्डधारकांना तहसीलदरांकडून धान्य न मिळाल्याची बतावणी करणे, उचल कलेले धान्य परस्पर विल्हेवाट लावणे. गावातील राजकारणी नेत्यांना हाताशी धरुन धान्य व केरोसीन न देता राजकारण करणे, धान्य व केरोसीन देण्यास टाळाटाळ करणे आदी प्रकार सुरू आहे. त्याने स्वत:च्या घरी धान्य वितरणाचे दुकान थाटले असून दुकानात भावफलक, साठाफलक लावण्यात येत नाही. अन्न सुरक्षा योजनेपासून अनेकांना हेतुपरस्पर वंचित ठेवल्या जात आहे. केरोसीन गोरगरीब कार्डधारकांना अल्प प्रमाणात देतो. उर्वरित केरोसीन वाहनचालकांना विकतो. सदर प्रकार गावकऱ्यांनी उघड केला. त्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये केल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली.याबाबत गावकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली. मात्र या प्रकरणाची गंभीरपणे चौकशी न करता दुकानदाराच्या घरी बसून गावकऱ्यांना बयाणासाठी बोलविण्यात आले. अगोदरच त्रस्त व भयभीत गावकरी दुकानदाराच्या घरी आपले म्हणणे मनमोकळे मांडू शकत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यांनी ग्रा.प. कार्यालयात बसून चौकशी करण्याची विनंती केली. मात्र ती फेटाळत दुकानदाराला वाचविण्यासाठी चौकशीचा फार्स अधिकारी करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे व वित्त व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे.या प्रकरणाची दखल घेवून वरिष्ठांमार्फत चौकशी करुन दुकानदाराचा धान्य व केरोसीन परवाना रद्द करण्याची मागणी नारायण कडूकर, सुरेंद्र चोथले, कवडू लिंगे, राजू काळे केली आहे. (वार्ताहर)
परसोडी येथील धान्य दुकानदारांवर मेहेरनजर
By admin | Updated: February 7, 2015 23:22 IST