चंद्रपूर : समाजातल्या विविध घटकांचे अध्ययन करून त्यातून निदान काढणे व प्रशासनाच्या मदतीने उपचार केल्यास या देशाचा विकासात हातभार लागू शकतो. ते कार्य समाजकार्य अभ्यासक्रमाचे विद्यार्थी अध्ययनादरम्यान व नंतरही प्रभावशाली पद्धतीने करु शकतात, असे प्रतिपादन नागपूर विभागीय समाजकल्याण विभागाचे उपायुक्त माधव झोड यांनी केले. स्थानिक सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज आॅफ सोशल वर्क येथे आयोजित बैठकीत ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील साकुरे उपस्थित होते. तर प्रा. डॉ. जयश्री कापसे समन्वयक म्हणून उपस्थित होत्या.२८ वर्षांपासून कार्यरत असलेल्या महाविद्यालयाची पार्श्वभूमी जाणून घेवून महाविद्यालयात असणाऱ्या सोयी सवलतींचा आढावा घेत उपआयुक्त झोड यांनी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांच्या आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या समस्येवर लवकरच तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्राचार्य साकुरे यांनी महाविद्यालयाची भूमिका विषद केली. चर्चेदरम्यान सर्व प्राध्यापकांनी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. बैठकीचे संचालन डॉ. जयश्री कापसे यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)
समाजकार्य महाविद्यालयात विभागीय उपआयुक्तांची बैठक
By admin | Updated: October 6, 2016 01:43 IST