डी.बी. भोंगळे : शिवाजी महाविद्यालयात पार पडला कार्यक्रमराजुरा: मराठी भाषा ही समृद्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या भाषेचे सखोल अध्ययन करावे, असे आवाहन शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डी.बी. भोंगळे यांनी येथे शुक्रवारी केले. राजुरा येथे मराठी विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.डी. बी. भोंगळे म्हणाले, मराठी समृद्ध भाषा आहे. तिचे अध्ययन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. केवळ माझे मराठी भाषेवर प्रेम आहे असे म्हटल्याने होत नाही तर आल्या कृतितून व्यक्त करता आले पाहिजे. आपल्या व्यवहारात ती दिसली पाहिजे. तरच आपले आपल्या भाषेवर प्रेम आहे, हे सिद्ध होते. मराठी भाषा आत्मसात करण्याची गरज आहे. ती आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ग्रंथांचे वाचन करावे. कथा, कादंबरी, कविता व नाटके यांचे अध्ययन आणि वाचन केल्याशिवाय आपण आपली भाषा समृद्ध करु शकणार नाही.या कार्यक्रमात प्रा. संजय लाटेलवार यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी त्यांनी कुसुमाग्रजांच्या कोलंबसाचे गर्वगीत, क्रांतीचा जयजयकार, पृथ्वीचे प्रेमगीत, कणा, वेडात मराठे वीर दौडले सात यासारख्या कविता आणि त्यातील कवी कुसुमाग्रजांचे काव्यविश्व याविषयी मत मांडताना मराठी कवितेतील कुसुमाग्रजांच्या साहित्याचे महत्व विशद केले.या कार्यक्रमाला अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. डब्ल्यू. बी. उलमाले, प्रा. डॉ. राजेंद्र मुद्दमवार, प्रा. डॉ. आर. आर. खेराणी, प्रा. विशाल दुधे उपस्थित होते. या कार्यक्रमात महेश शुद्धाले, हरिदास लेडांगे, प्रिती बोबडे, प्रकाश गेडाम या विद्यार्थ्यांनीही विचार व्यक्त केले. संचालन प्रा. संतोष देठे यांनी तर आभार प्रा. विठ्ठल आत्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)
मराठी समृद्ध भाषा आहे, विद्यार्थ्यांनी सखोल अध्ययन करावे
By admin | Updated: April 20, 2016 01:26 IST