अडचणी दूर करा : कुलगुरुंना निवेदन
गडचांदूर : गोंडवाना विद्यापीठांतर्गत संशोधन कार्य करीत असताना संशोधक विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आचार्य पदवीकरिता निर्धारित पेट परीक्षेमध्ये विविध विषयांतर्गत अनेक विद्यार्थी पास झालेली असून, प्रत्येकाला संशोधनाची संधी मिळणे क्रमप्राप्त आहे. या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनने विविध समस्या सोडविण्याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी, प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे व कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांना निवेदन दिले आहे.
पीएचडी कोर्स वर्क कालावधी कमी करणे, तसेच या कोर्स वर्कसाठी आकारण्यात आलेले अवास्तव शुल्क कमी करणे, आचार्य पदवी संशोधन प्रबंध सादरीकरण फी कमी करणे, आचार्य पदवी बहिस्थ पर्यवेक्षकाकरिता पीएचडी संशोधन प्रबंधांचे अचूक मूल्यांकन करण्यासाठी गुणात्मक मूल्यांकन अहवालाचे स्वरूप तयार करणे, विद्यापीठांतर्गत मान्यता दिलेल्या विविध विषयांच्या संशोधन केंद्रावर विद्यार्थ्यांची व सहयोगी मार्गदर्शकांची संख्या वाढवणे तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम नसलेल्या मात्र आचार्य पदवीचे मार्गदर्शक असलेल्या पदवी महाविद्यालयात नवीन संशोधन केंद्रे निर्माण करणे आदी अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. यावेळी गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय गोरे, सचिव प्रा. डॉ. विवेक गोरलावार, उपाध्यक्ष डॉ. नंदा सातपुते, सहसचिव डॉ. प्रमोद बोनधाने उपस्थित होते.
230921\img-20210923-wa0071.jpg
निवेदन देतांना असोसिएशनचे पदाधिकारी