नागरिकांनी केली महापौरांसह आयुक्तांकडे तक्रार
चंद्रपूर : येथील राष्ट्रवादी नगरमध्ये महापालिकेची परवानगी न घेता उभारण्यात आलेला मोबाइल टाॅवर मनपाच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळी हटविला. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्याकडे तक्रार केली होती. तक्रारीची दखल घेत त्यांनी महापौर तसेच आयुक्तांना पत्र लिहून टाॅवर हटिवण्याची विनंती केली. यानंतर अतिक्रमण विभागाच्या पथकाने सदर टाॅवर जेसीबीच्या साह्याने हटवून टाॅवरचे साहित्य जप्त केले.
येथील राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक १ मध्ये एका प्लाॅटवर महापालिका तसेच संबंधित विभागाची कोणतेही परवानगी न घेता मोबाइल टाॅवरचे बांधकाम केले जात होते. या टाॅवरमुळे परिसरातील नागरिकांनी आरोग्याचा प्रश्न उपस्थित करून सदर टाॅवर येथे उभारू नये यासंदर्भात नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्यासह महापौर आणि आयुक्तांनाही निवेदन दिले होते. या निवेदनानंतरही येथे टाॅवरचे काम पूर्णत्वास येत असल्याने नागरिकांनी नगरसेवक कासनगोट्टूवार यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. यानंतर नगरसेवक कासनगोट्टूवार यांनी महापौर तसेच आयुक्तांना पत्र देऊन सदर टाॅवर हटविण्याची विनंती केली. यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी सकाळपासून सदर टाॅवर हटविण्याची कारवाई केली. यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. ही कारवाई उपायुक्त विद््या वाकडे यांच्या मार्गदर्शनात अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.