पाटण : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे उपचारासाठी आलेल्या रुग्णांना उपचाराऐवजी निराश होऊन परतावे लागत आहे. सध्या जिवती तालुक्यातील पाटण परिसरात मलेरियाची साथ सुरू आहे, हे विशेष.प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे ६५ गावांचा समावेश आहे. आरोग्य केंद्रातंर्गत चार उपकेंद्र आहेत. परंतु येथील आरोग्य यंत्रणा औषधीअभावी जनतेसाठी शाप ठरत आहे. सर्वसामान्यासह मजूर व शेतकरी वर्ग आर्थिक परिस्थितीमुळे खाजगी रुग्णालयात उपचार करु शकत नाही. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, येथे उपचार होत नाही.मागील अनेक दिवसापासून आरोग्य केंद्रात औषधीचा तुटवडा असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोग्य केंद्रातील बाह्य रुग्ण विभागात जास्त रुग्ण येत असतात. परंतु या आरोग्य केंद्रात सुविधाचा अभाव असल्याने विविध समस्या भेडसावत आहे. याकडे लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असून रुग्ण कल्याण समिती केवळ नावापूर्तीच आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील समस्याकडे लक्ष देणार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.पदाधीकारी व अधिकाऱ्यांच्या गैरसोयीमुळे रुग्णाची अवस्था अडकीत्यातील सुपारीसारखी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये मलेरिया व डेंग्यूसदृश्य आजाराची लागण झाली असल्याने नागरिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील अनेक घरात मलेरियाच्या तापाने नागरिकांना घेरले आहे. डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. परिसरातील नागरिकांना आरोग्य विषयक समस्यांना नेहमीच सामोरे जावे लागते. आधीच आर्थिक संकटात सापडलेले शेतकरी खासगी उपचार करु शकत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधीसाठा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.पहाडावरील आदिवासी भागात पुरेशी दळणवळणाची सोय नाही. त्यामुळे आरोग्य किंवा इतर विभागाचे अधिकारी येथे फिरकून पाहत नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही आणि बदलत्या वातावरणामुळे आता विविध आजाराची साथ पसरली आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देण्याची परिसरातील नागरिकांची आहे. (वार्ताहर)
जिवती तालुक्यात मलेरियाची साथ
By admin | Updated: October 27, 2014 22:33 IST