जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : टोल नाक्यावर रोजगाराची संधी घुग्घुस : बहुउद्देशिय संघर्ष समिती पांढरकवडातर्फे घुग्घुस- पडोली रस्त्यावरील नव्याने टोल नाका उभारण्यात येत आहे. यामध्ये परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे निवेदन बहुउद्देशिय संघर्ष समिती पांढरकवडातर्फे उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील नव्यानेच टोल नाका उभारण्यात येत आहे. सदर टोल नाक्याचे काम चंद्रपूर ते करंजी (ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ) हायवे रोड प्रोजेक्ट आरसीएल या कंपनीकडे आहे. येणाऱ्या ३० वर्षांपर्यंत बिओटी तत्वावर सदर कंपनी या रोडवरील टोल वसूल करणार आहे. पुर्वीपेक्षा या रोडवरील रहदारी खुप वाढली आहे. या टोल नाक्यावर १०० पेक्षा जास्त बेरोजगार लागणार आहे. तरी पांढरकवडा, महाकुर्ला, धानोरा, शेणगाव, अंतुर्ला, वढा, नागाळा, सोनेगाव, सिंदूर या गावातील युवक, युवतींना रोजगारांची संधी उपलब्ध करून देण्यात यावी व यावरील सर्व अधिकार वायव्हीआरसीएल कंपनी इंचार्ज यांना आहे. त्यांनी जवळील गावातील नागरिकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून बेरोजगारांना न्याय द्यावा. निवेदन देताना बहुउद्देशिय संघर्ष समिती पांढरकवडाचे अध्यक्ष हितेश लोडे, उपाध्यक्ष दीपक खारकर, सचिव स्वप्नील नळे, कार्याध्यक्ष अमित वानखेडे, रंजित मासिरकर, हरिश मत्ते, गुलाब पोडे, देविदास देशमुख, वैभव पुरडकर, अतुल हागे, समिर भिवापुरे, विकास विरुटकर, मंगेश आसूटकर हे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्या
By admin | Updated: July 24, 2016 01:01 IST