वरोरा : उन्हाळा संपायला बरेच दिवस शिल्लक असताना वर्धा नदीची धार आटली होती. नजिकच्या धरणामध्ये अत्यल्प पाणी साठी शिल्लक असल्याने आता वर्धा नदीतून पाणी मिळणार असल्याने एकूणच खळबळ उडाली होती. त्यावर प्रशासनाने मार्ग काढीत लोअर वर्धा धरणाचे पाणी वर्धा नदीत सोडल्याने वरोरा शहरासह २५ गावांना नदीचे पाणी मिळणार आहे.वरोरा शहराला वर्धा नदीच्या पात्रातून तुलाना घाटावरुन पाणी पुरवठा केला जातो. वरोरा शहरासह २५ गावांमध्ये याच नदीवरुन पाणी पुरवठा करण्यात येतो. गावानजिक नदी असल्याने गावातील विहिरी, बोअरिंग, ट्युबवेल यांच्या जमिनीच्या पातळ्यात पाणी राहाते. उन्हाळा सुरू होताच वर्धा नदीची धार आटल्याने नदीतून वरोरा शहराला दिवसाआड पाणी पुवरठा होत होता. तसेच इतर २५ गावांनाही पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे वर्धा नदीत धरणाचे पाणी सोडून यावर मात करण्याची मागणी करण्यात आली. परंतु नजिकच्या वर्धा जिल्ह्यातील लाल व पोथरा धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक नसल्याने पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्यास नकार दिल्याने प्रशासन खडबडून जागे झाले होते. वरोरा इंका शहर अध्यक्ष तथा नगरसेवक छोटू शेख यांनी वर्धा जिल्ह्यातील लोअर धरणातून वर्धा नदीत पाणी सोडावे. अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनातून दिला होता. यासोबतच वर्धा नदीतील पाण्यावर विसंबून असणाऱ्या गावातील नागरिकांनी पाण्यासाठी आग्रही मागणी केली होती. अखेर दोन दिवसांपूर्वी लोअर वर्धा धरणातून वर्धा नदीमध्ये पाणी सोडले जात आहे. सदर धरणातील पाणी वर्धा नदीत सोडण्यात आल्याने वरोरा शहरासह २५ गावांतील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. येत्या काही दिवसात वरोरासह २५ गावानजिकच्या पात्रात पाणी येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)
लोअर धरणाचे पाणी वर्धा नदीत
By admin | Updated: May 22, 2015 01:19 IST