गुलाबपुष्प महागले : व्हेलेंटाईन डे रविवारी आल्याने प्रेमवीरांची उडणार तारांबळप्रकाश काळे गोवरी‘व्हेलेंटाईन डे’ तमाम तरुण-तरुणींचा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. जगातल्या सगळ्या नात्याहुन मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं. जात, धर्म, प्रथा, परंपरा ठोकरून ते आपल्याच धुंदीत फुलत राहतं. मैत्रीच्या या नात्यात व्यवहार नसतो. असते केवळ एका मनाचं दुसऱ्या मनाशी निखळ आपुलकीचं गोड गुंजन. सच्चा प्रेमाची भेट घडावी अन् कळत-नकळत नवी नाती जुळावी. याच धर्तीवर प्रेम व्यक्त करण्यासाठी तमाम तरुणाई १४ फेब्रुवारीला प्रेमदिनी एकवटणार असली तरी यावर्षी ‘व्हेलेंटाईन डे’ रविवारी आल्याने अनेक प्रेमविरांची तारांबळ उडणार आहे.‘व्हेलेंटाईन डे’ तरुणांच्या उत्साहाचा दिवस. वर्षभर मनात जपलेल्या आठवणी, बोलताना तिचा शब्द अन् शब्द खरा वाटावा एवढा मैत्रीचा गोडवा, मनात अंकुरलेल्या भावना ओठांपर्यंत येतात. पण तोंडातून शब्द फुटत नाहीत. प्रेम या अडीच अक्षराच्या शब्दाने जगालाही भूरळ पाडली आहे. ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं’ ही प्रेमाची संकल्पना शब्दाने सोपी असली तरी तितकीच कठीण आहे. अनेक तरुण-तरुणी प्रेम व्यक्त करण्यासाठी मैत्रीचा नाजुक धागा पकडून प्रेमाच्या बंधनात बांधले जातात. मैत्री झाल्यावर मैत्रीचा धागा कोणत्या सीमारेषेपर्यंत असायला हवा याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. केवळ भावनेच्या आहारी जाऊन थोड्याफार विश्वासावर युवती आपले सर्वस्व अर्पण करायला तयार असते. प्रेम फुलपाखरासारख नाजूक असतं. प्रेमात सुखाची लाट येईल, निखळ मैत्रीचा सहवासही लाभेल. परंतु प्रेमभंग झाला तर... कधी कधी दोघांचे सूर जुळत नाहीत. पाहता-पाहता वाटा बदलतात. कधीही पुन्हा एकत्र न येण्यासाठी. प्रेमाने जगण्याची ताकद द्यावी की, मुळापासून उद्ध्वस्त करून टाकावे आपल्याला. पण कितीही ठरवलं तरी मन हळवं होतं. मनावर ताबा ठेवला तर घाव कसा भरायचा हे ठरविता येतं प्रेमात. प्रेमभंग झाला तर प्रत्येकांकडे असतात आपली म्हणून काही उत्तरं... परंतु तारुण्याच्या उंबरठ्यावरून चालताना नको त्या गोष्टींना पसंती देणे कितपत योग्य आहे. आयुष्य घडवायचे की त्याची वाताहत करायची, हा ज्यांचा त्यांचा प्रश्न असला तरी यावर विचारमंथन करणे गरज होऊन बसले आहे. यावर्षी ‘व्हेलेंटाईन डे’ रविवारी आल्याने अनेक महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कॉलेजच्या निमित्ताने घराबाहेर भेट घेण्याची संधी गमवावी लागणार आहे. काहींनी ‘व्हेलेंटाईन डे’ कुठे साजरा करायचा याचे आधीपासूनच प्लॅनिंग केले आहे.
प्रेम व्यक्त करण्यासाठी भरणार प्रेमीयुगुलांचा मेळा
By admin | Updated: February 14, 2016 01:06 IST