डॉक्टरांचे दुर्लक्ष : रुग्णांना धरतात वेठीसचंद्रपूर: मागील काही दिवसांपासून विविध आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यू, मलेरियासारख्या आजाराने तर, नागरिकांना अक्षरश: त्रस्त करून सोडले आहे. यातच प्रदूषण आणि इतर समस्यांमुळे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय रुग्णालयातील गर्दी आणि तेथील असुविधांमुळे सर्वसाधारण कुटुंबातील रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी जात आहे. मात्र येथे डॉक्टरांच्या शुल्काव्यतिरिक्त काही रुग्णालयातील कर्मचारी चहापानाच्या नावाखाली अतिरिक्त वसुली करीत आहे. एवढेच नाही तर, पैसे न दिल्यास रुग्णाला वेठीस धरण्याचा प्रकारही सुरु आहे. रुग्णालयातून एकदाचे मोकळे होण्यासाठी रुग्णांचे कुटुंबीय पैसे देऊन मोकळे होतात. दिवसेंदिवस हा प्रकार सर्रास सुरु असल्याने यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे.औद्योगिक जिल्हा म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूर शहरात खासगी रुग्णालयांची संख्या मोठी आहे. अपघात आणि इतर आजारी रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसात डेंग्यू, मरेरिया या आजाराने थैमान घातले आहे. शहरातील बहुतांश रुग्णालयात विविध आजारी रुग्णांची वर्षभरही गर्दी असते. चार-आठ दिवस किंवा आजारानुसार डॉक्टर रुग्णालयात रुग्णांना दाखल करतात. रुग्ण दाखल होताच काही रुग्णालयातील कर्मचारी चहा पानाच्या नावाखाली त्यांच्याकडून वसुली करतात. हा प्रकार जुना असला तरी सध्या काही कर्मचाऱ्यांनी यात मजल मारली आहे.मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनासुद्धा चहा पानासाठी पैसे मागितल्याशिवाय रुग्णालयातून सोडत नसल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या एका सर्व्हेक्षणात आढळून आले आहे. शहरात मोठ्या प्रमाणात खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयात रुग्णांना सोयी पुरविण्यात येते. अनेकवेळा डॉक्टरही अतिरिक्त बिल वसुल करीत आहे. विशेष म्हणजे, रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णाला बिल न देताच एका कागदावर रक्कम लिहून दिल्या जात आहे. काही डॉक्टरच रुग्णांची अशी लुट करीत असल्याने त्या रुग्णालयातील कर्मचारीही यात मागे नाही. रुग्ण दाखल होताच त्याच्या नातेवाईकांकडून चहा-पाण्याच्या नावाखाली पैसे मागितल्या जाते. एका रुग्णालयात किमान दहा ते पंधराच्या संख्येने कर्मचारी असतात. अशावेळी रुग्णाला कर्मचाऱ्यांना चहापानी करताना नाकीनव येत आहे. कर्मचारी शहरी रुग्णांच्या कुटुंबीयांच्या तुलनेत ग्रामीण रुग्णांना जास्त प्रमाणात लुटत असल्याची माहिती मिळाली आहे.अनेकवेळा कर्मचाऱ्यांसमोर रुग्णांचे नातेवाईक हतबल होत आहे. या प्रकाराकडे मात्र डॉक्टरांचे दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे, डॉक्टर वेतन कमी देत असल्याने पैसे मागावे लागतात. असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमध्ये रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार शहरातील काही रुग्णालयात सुरु असतानाही डॉक्टरांचे तसेच त्यांना मान्यता दिलेल्या वरिष्ठांचेही याकडे अदुर्लक्ष होत आहे. (नगर प्रतिनिधी)
खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची लूट
By admin | Updated: October 9, 2014 22:58 IST