चंद्रपूर : मराठीचा सन्मान आणि महाराष्ट्राचा मानबिंदू ठरलेल्या ‘लोकमत दीपोत्सव’ अंकाचे आज गुरुवारी येथील लोकमतच्या जिल्हा कार्यालयात सायंकाळी ५ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत थाटात लोकार्पण झाले. या लोकार्पण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आनंद नागरी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोरे, ओरियंटल इन्शोरन्सचे क्षेत्रीय व्यवस्थापक विजय सावतकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजय हिरेमठ, बजाज कॅपीटलचे व्यवस्थापक प्रज्वल झिलपे, चार्टंट अकाऊंटंट हर्षवर्धन सिंघवी, लोकमत परिवारातील ज्येष्ठ सदस्य डॉ. अशोक बोथरा, लोकमत चंद्रपूरचे सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर होते. अध्यक्षस्थानाहून बोलताना आनंद नागरी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख म्हणाले, लोकमतने आजवर नेहमीच अभिनव आणि वेगवेगळे उपक्रम राबविले आहे. त्याचे सर्वांनीच उत्साहाने स्वागतही केले आहे. हा दीपोत्सव तयार करण्यासाठी बुध्दीजिवी आणि श्रमजिवी घटकांचे कष्ट लागले आहे. या दोन घटकांचा जिथे हात लागतो, ते प्रॉडक्ट नेहमीच चांगले तयार होते. ओरियंटल इन्शोरन्सचे क्षेत्रीय व्यवस्थापक विजय सावतकर यांनी त्यांच्या लोकमतशी जुळलेल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, लोकमतचा मी फार पूर्वीपासून वाचक आहे. काही वर्षांपूर्वी माझे अकोला येथे स्थानांतरण झाले. त्यावेळी बदलीच्या सुरूवातीच्या दिवसात लोकमत चहासोबत वाचायला मिळत नव्हता. त्यावेळी आपल्या आयुष्यातून काहीतरी वजा झालंय, अशी भावना मनात यायची. सकाळी उठल्यावर चहाचा कप आणि चांगले वृत्तपत्र वाचायला मिळाले तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असेही ते म्हणाले.जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोरे यांनी अंकाच्या तांत्रिक अंगांचे आणि अंतरंगाचे कौतूक केले. ते म्हणाले, या दीपोत्सवचे मुखपृष्ठच एवढे बोलके व आकर्षक आहे की, त्यावरून संपूर्ण अंकाची कल्पना येते. लोकमतचा दीपोत्सव म्हणजे दिवाळीची एक मेजवाणीच असते. या दीपांच्या उत्सवात बुध्दीलाही चांगला फराळ मिळतो. बँक आॅफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजय हिरेमठ म्हणाले, लोकमतचा दीपोत्सव सर्वांनाच हवाहवासा वाटतो. सर्वच त्याची आतूरतेने वाट बघत असतात. यावेळी दीपोत्सवमध्ये ज्या व्यक्तींना सहभागी करून घेतले आहे, ते पाहून अंक वाचून काढण्याची इच्छा प्रत्येकालाच व्हावी, असा हा अंक आहे. चार्टंट अकाऊंटंट हर्षवर्धन सिंघवी आणि बजाज कॅपीटलचे व्यवस्थापक प्रज्वल झिलपे यांनीही लोकमतच्या दीपोत्सवला शुभेच्छा देवून कौतूक केले. लोकमतचे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून व दीप प्रज्वलन करून या सोहळ्याची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत रोपटे देऊन करण्यात आले. प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर यांनी केले. संचालन लोकमतचे इव्हेंट एक्झीक्युटीव्ह सुरज गुरुनुुले यांनी केले. तर सहायक शाखा व्यवस्थापक विनोद बुले यांनी आभार मानले. यावेळी लोमकतचे वितरण अधिकारी रविराज अंबडवार, वसंत खेडेकर, लोकमतचे चंद्रपुरातील प्रमुख वितरक रमण बोथरा आणि जितेंद्र चोरडीया यांच्यासह लोकमतचे चाहते आणि लोकमत जिल्हा कार्यालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
लोकमतचा दीपोत्सव म्हणजे दिवाळीची मेजवाणीच
By admin | Updated: November 6, 2015 02:15 IST