नवरगाव : रत्नापूर येथे मंगळवारी रात्री स्पार्किंग होऊन अचानक जिवंत विद्युत तार तुटली आणि रस्त्यावर पडली. त्यावेळी कुणीही रस्त्यावर नसल्याने जीवितहानी टळली. मात्र अनेकांची विद्युत उपकरणे जळाली.
येथील वाॅर्ड १ मध्ये मारोती मेश्राम यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खांबावरील जिवंत विद्युत तारांना झाडाच्या फांदीचा स्पर्श झाल्याने त्या ठिकाणी स्पार्किंग होऊन अचानक स्फोट झाला. यामुळे जिवंत विद्युत तार तुटली आणि रस्त्यावर पडली. मात्र रात्रीची वेळ असल्याने नागरिक घरात होते. त्यामुळे जीवितहानी टळली. या घटनेने परिसरातील विद्युत पुरवठा लगेच बंद झाला. शिवाय काही नागरिकांच्या घरचे टीव्ही, फ्रीज व इतर उपकरणे बिघडली. यामध्ये नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले. विद्युत विभागाला माहिती मिळताच घटनास्थळावर पोहोचले आणि परिसरातील काही भागाचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरू केला. मात्र काही भाग रात्रभर अंधारात होता.