चंद्रपूर : येथून जवळच असलेल्या मामला तसेच परिसरामध्ये मागील तीन दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. दरम्यान, सिंचन पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे भाजीपाला तसेच इतर पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
चंद्रपूरच्या अगदी शेजारी आणि जंगलव्याप्त गाव असलेल्या मामला परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे. काही जण दुग्ध व्यवसाय तसेच अन्य शेतकरी भाजीपाला तसेच अन्य पीक घेऊन उपजीविका करतात. त्यांचे पूर्ण अर्थचक्रच शेतीवर अवलंबून आहे. मात्र तीन ते चार दिवसांपासून येथील वीजपुरवठा खंडित झाला आहे. दोन दिवसांपूर्वी गावातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. मात्र शेतशिवारात वीज नसल्याने शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. या परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा वावर आहे. त्यामुळे शेतकरी कायम दहशतीत असतो. अशावेळी वीजपुरवठाही खंडित झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, खंडित वीजपुरवठ्यामुळे सिंचन करणे कठीण झाले आहे. त्यामुळे भीजापावर्गीय पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महावितरण कंपनीने याकडे लक्ष देऊन येथील गाव तसेच शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.