महिला जखमी : आठवड्यात तिसरी घटना
सावली : तालुक्यातील वाघोली बुटी येथील एका ७० वर्षीय महिलेच्या घरात शिरून बिबट्याने हल्ला केला. यात महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली.
तुळसाबाई बाबूराव म्हशाखेत्री असे जखमी महिलेचे नाव आहे. आठवडाभरापासून या परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. आतापर्यंत याच परिसरात बिबट्याचे तीन हल्ले झाले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
यापूर्वी व्याहाड बुज येथील महिलेला घरातून फरपटत नेऊन ठार केले. तर नजीकच्या सामदा बुज येथील शेतावर जाणाऱ्या शेतकऱ्यावर हल्ला केला. ही घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा त्याच परिसरातील वाघोली बुटी येथील तुळसाबाई म्हशाखेत्री हिच्या घरात शिरून तिला बिबट्याने जखमी केले. जखमी महिलेला गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वनविभागाकडून तातडीने पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून हल्लेखोर बिबट्याला पकडण्यासाठी विविध ठिकाणी चार पिंजरे लावले असून पुन्हा दोन पिंजरे लावणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत कामडी यांनी सांगितले.
200721\img-20210720-wa0178.jpg
बीबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेली तुळसाबाई.