चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन ठिकाणी केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत दारूसाठा, दोन वाहने असा सुमारे ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त करुन एका चालकाला अटक केली आहे. विनोद आडे रा. वर्धा असे अटकेतील चालकाचे नाव आहे. तर फरार आरोपीचा शोध सुरु आहे.
चंद्रपुरातून दुसऱ्या जिल्ह्यात दारू तस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर खाडे यांनी दारूतस्करीवर आळा घालण्यासाठी विशेष पथके गठित केली आहेत. शहर पोलीस ठाणे हद्दीतील छोटा बाजार चौकातील एका गल्लीत बेवारस स्थितीत असलेल्या वाहनात दारूसाठा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून वाहनाची तपासणी केली. त्यात ११५ पेट्या देशी दारू, २४ पेट्या विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा जप्त केला. चालक, मालकाचा शोध सुरू आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, दुसरी कारवाई रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील जनता कॉलेज चौक परिसरात करण्यात आली. चारचाकी वाहनाने दारूची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाची चौकशी केली असता त्यात विदेशी दारूच्या ४४ पेट्या आढळून आल्या. यावेळी वाहन चालक विनोद आडे याला अटक केली. त्याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.