जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : शेतकऱ्यांत आनंद, मात्र पेरण्या तूर्तास थांबल्या चंद्रपूर : गेल्या कित्येक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला वरूणराजाने दिलासा दिला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून सतत सरीवर सरी बरसत आहेत. या पावसाने शेतकऱ्यांत आनंद पसरला असला तरी पाऊस अद्याप थांबलेला नसल्याने पेरणीची कामे तुर्तास थांबलेली आहेत. हवामान खात्याच्या अंदाजावर विश्वास ठेवत अनेक शेतकऱ्यांनी मृग नक्षत्राच्या सुरूवातीला पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला आणि पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला. गेल्या एक महिन्यापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. चार दिवसांपुर्वी चंद्रपुरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. मात्र उर्वरीत तालुक्यात पाऊस झाला नाही. त्यानंतर चार-पाच दिवस कडक उन्ह तापली. त्यामुळे शेतकरी विवंचनेत सापडले. तर काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले.मात्र रविवारपासून जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस सुरू असून सरीवर सरी बरसत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात कोरडी पडलेल्या नदी, नाल्यांचा प्रवाह सध्या काही प्रमाणात सुरू झाल्याचे दिसून येत आहे. सोमवारीही जिल्ह्यात दमदार पाऊस सुरूच होता. दोन दिवसांपासून कधी मोठा तर कधी रिमझीम पाऊस असल्याने पेरणीचे कामे थांबविण्यात आली आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)परसोडा नाल्याला पूररविवार व सोमवारी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोरपना तालुक्यातील परसोडा नाल्याला पूर आला. त्यामुळे परसोडा-परसोडा गुळा हा मार्ग दुपारी बंद झाला. सायंकाळी पाऊस कमी झाल्याने नाल्याचा पूर ओसरला व वाहतूक सुरू झाली.गोंडपिंपरी, कोरपना तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंदरविवारी गोंडपिंपरी या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. या तालुक्यात १२१ मिमी पाऊस झाला. तर कोरपना तालुक्यात १०१ मिमी व जिवती तालुक्यात ७०.२ मिमी पाऊस झाला. वरोरा व भद्रावती या तालुक्यात पाऊस झाला नाही. जिल्ह्यात पावसाची सरासरी २५.९० एवढी आहे.
अखेर बरसल्या सरीवर सरी
By admin | Updated: June 29, 2016 00:53 IST