दुर्गापूर मार्गावरील अतिक्रमण हटवा
चंद्रपूर : येथील निर्माणनगर, तुकूम प्रभाग क्र. १ येथे दुर्गापूर रोडपासून निर्माण नगर रोड, यशोगंगा लॉनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने अतिक्रमण वाढले आहे. दुर्गापूर रोडपासून ते निर्माणनगरचा रोड हा ६० फुटांचा आहे. परंतु, दोन्ही बाजूच्या रहिवाशांनी यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे तो मार्ग अरुंद झाला आहे.
सिग्नल सुरू करण्याची मागणी
चंद्रपूर : येथील काही चौकांतील सिग्नल सुरू नसल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका तसेच वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन शहरतील सिग्नल सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. येथील ट्रायस्टार हॉटेलजवळ तसेच मिलन चौकांमध्ये सिग्नल आहे. मात्र ते बंद अवस्थेत आहे.
वसतिगृहातून विलगीकरण कक्ष हटवा
चंद्रपूर : विलगीकरण कक्षासाठी चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह ताब्यात घेऊन विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे लगबगीने वसतिगृह सोडावे लागले. मात्र त्यांची मूळ कागदपत्रे वसतिगृहातच लटकून आहेत. वसतिगृहात विलगीकरण कक्ष असल्याने वसतिगृहात जाण्यास बंदी आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचण होत आहे.
गुळगुळीत रस्ते झाले खाचखळग्यांचे
सावली : येथे नळ योजनेचे पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. शहरातील काही वॉर्डांत अंतर्गत सिमेंट रस्ते फोडून पाइप टाकण्यात आले. मात्र पाइप टाकून त्यावर केवळ माती टाकण्यात आली. त्यामुळे गुळगुळीत असणारे रस्ते खाचखळग्यांचे झाले आहेत. याकडे लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
झुडपी जंगलांमुळे जंगली जनावरांचा वावर
सास्ती : वेकोलिच्या कोळसा खाण परिसरात मातीच्या ढिगाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात झुडपी वाढली आहेत. येथे मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा वावर असून शेतात हैदोस घालत आहेत. परिसरातील सास्ती, गोवरी, साखरी, पोवनी, चार्ली, कढोली, मानोली, बाबापूर येथील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान करीत आहेत.
कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्याची मागणी
चंद्रपूर : बस आगाराच्या कर्मचाऱ्यांचे मागील दोन महिन्यांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनाची दहशत असताना कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. मात्र त्यांचे वेतन प्रलंबित आहे.
जेनरिक औषधसाठा वाढवण्याची मागणी
चंद्रपूर : पंतप्रधान जनआरोग्य औषधी केंद्रामध्ये शासनाच्या सवलतीत औषधसाठा वितरित करण्यात येतो. मात्र या केंद्रात अत्यल्प प्रकारचा औषधसाठा उपलब्ध आहे. परिणामी, अतिरिक्त पैसे देऊन रुग्णांना औषधांची खरेदी करावी लागत आहे. औषधसाठा वाढवण्याची मागणी आहे.
कोळशाच्या धुळीने पिकांचे नुकसान
सास्ती : वेकोलि कोळसा खाण परिसरातून होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे परिसरात कोळशाची धूळ उडते. यामुळे या भागातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कापूस पूर्णत: काळा पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावर आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
जिवती : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने तालुक्याच्या ठिकाणी ठरावीक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र कोरोनामुळे यावरही आता परिणाम झाला आहे. त्यामुळे पुन्हा गावागावांत शिबिर सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पहाडावरील रस्त्यांची दुरुस्ती करावी
जिवती : गाव तिथे रस्ता अन् रस्ता तिथे वाहन पोहोचविण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयोग केले जात आहेत. मात्र योेजनेचा निधी खर्चूनही पहाडावर रस्त्याची स्थिती बिकट आहे. प्रशासनाच्या या गलथानपणामुळे रस्त्यावर खड्डे आणि धुळीने वाहनचालकांसह प्रवासी वैतागले आहेत. पहाडावर सातत्याने अपघात होत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
समित्यांना सक्रिय करण्याची मागणी
मूल : तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील यांनी गावातील तंटे गावात सोडविण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समितीची स्थापना केली. पूर्वी या समितीला चांगले दिवस होते. मात्र सद्य:स्थितीत या समित्या थंडबस्त्यात आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर या समित्या सक्रिय कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
शासकीय निवासस्थानी राहणे सक्तीचे करा
चंद्रपूर : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांच्या देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड पडून असल्याचे दिसत आहे.
खुल्या जागांची दैनावस्था कायम
चंद्रपूर : मनपा क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. न. प. प्रशासनाने शहरातील सर्वच ओपन स्पेसचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.