नागभीड : वैजापूर (टोली) येथील मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मनोहर कुंभरे यांची निर्घृण हत्या होऊन १० दिवसाचा कालावधी होत आहे. तरी पोलीस मारेकऱ्याचा शोध घेऊ शकले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केला जात आहे.वैजापूर (टोली) येथील मनोहर मारोती कुंभरे (६५) गावातच मासेमारी करून उदरनिर्वाह करायचे. २ नोव्हेंबर रोजी ते दुपारी ३ च्या सुमारास मासेमारी करण्यासाठी घरून निघाले. सायंकाळपर्यंत मासेमारी केली आणि त्या मासोळ्या जवळच असलेल्या गोपाळ टोली यथे विकल्या आणि गावाकडे निघाले. पण ते घरी पोहचलेच नाही.३ नोव्हेंबर रोजी सकाळी शेताकडे आणि शौचास जाणाऱ्या गावकऱ्यांना मनोहरचा मृतदेह रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याचे दिसून आले. सकृतदर्शनी हा खुनाचाच प्रकार असल्याने पोलिसांनीही याप्रकरणी भादंवीच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला. या घटनेला आता जवळपास १० दिवसाचा कालावधी लोटला आहे. परंतु, पोलीस मनोहर कुंभरे यांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहचू शकलेले नाही. याबद्दल परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान ८ नोव्हेंबरला अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रिया जनबंधू यांनी घटनास्थळाला भेट दिल्याची माहिती आहे. त्यांच्या या भेटीत खुनाबद्दल काय माहिती गळाला लागली हे गुलदस्त्यातच आहे.दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहर कुंभरे यांच्या खुनाचा तपास ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रिया जनबंधू यांनी स्वत:कडे घेतल्याची माहिती आहे. पोलिसांनी मनोहर कुंभरेच्या खुन करणाऱ्या आरोपीस लवकरात लवकर जेरबंद करुन शिक्षा देण्याची मागणी तळोधी (बाळापूर) परिसरातून होत आहे. पोलीस प्रशासन कारवाईसाठी आता काय अॅक्शन घेतात याकडे तळोधी बाळापूर परिसराती नागरिकांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)
कुंभरे यांचे मारेकरी मोकाटच
By admin | Updated: November 11, 2014 22:37 IST