घोसरी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषिक्रांती योजनेच्या मागासवर्गीय घटकातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर व सिंचनाची साधने पुरवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या हेतूने वीज जोडणी आकार (डिमांड) देण्यास दिरंगाई होत असल्याने पोंभूर्णा तालुक्यातील शेतकरी वंचित असल्याने श्रमिक एल्गारतर्फे आंदोलन करणार असल्याचा इशारा वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.
पोंभूर्णा तालुक्यातील सातारा तुकुम, सातारा भोसले, सातारा कोमटी, उमरी पोतदार व उमरी तुकुम येथील निवड झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज व आवश्यक दस्ताऐवज वीज जोडणी आकार मिळण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात सादर करण्यात आले आहे.
त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांनी शेतातील सिंचन विहिरीचे प्रत्यक्ष सर्व्हे व मोजमाप करून तसा अहवाल सादर केला होता. परंतु सात महिन्याचा कालावधी लोटून सदर योजनेच्या लाभार्थ्यांना विद्युतीकरणासाठी वीज जोडणी आकार मिळालेला नाही. परिणामी लाभार्थ्यांचे अनुदान निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन सुविधेपासून वंचित राहून फार मोठे नुकसान होणार आहे.
त्यामुळे येत्या दहा दिवसात सदर योजनेच्या लाभार्थ्यांना वीज जोडणी आकार देण्यात यावा. अन्यथा न्याय मागणीसाठी आंदोलन करणार असल्याचा इशारा श्रमिक एल्गारचे अध्यक्ष प्रवीण चिचघरे यांनी वीज वितरण कंपनीला दिलेल्या निवेदनातून दिलेला आहे.