चिमूर : तालुक्यातील उरकुडपार शेतशिवारात अनैतिक संबंधातून घडलेल्या खून प्रकरणाचा २४ तासाच्या आत छडा लागला आहे. संशयित आरोपी महिला प्रज्ञा गेडाम व तिचा भाऊ सिद्धार्थ लोखंडे (२२) यास सोमवारी पोलिसांनी गजाआड केले असून एक आरोपी फरार आहे. नातलगाच्या मदतीने महिलेने युवकाचा काटा काढल्याची माहिती उपअधीक्षक डॉ. विशाल हिरे यांनी दिली. नवेगाव पेठ येथील मनोज नामदेव जुमनाके या युवकासोबत चिमूर येथे राहणारी व सध्या उरकुडपार येथे वडिलाकडे राहणारी प्रज्ञा बंडू गेडाम हिचे सतत संपर्क होते. मात्र त्यांच्यात वाद झाल्याने मनोजचा काटा काढण्याचा डाव प्रज्ञाने रचला. प्रज्ञाने भाऊ सिद्धार्थ लोखंडे रा. उरकुडपार व एका नातलगाच्या मदतीने कट रचला. २४ डिसेंबरला फोन करून मनोजला उरकुडपारला बोलाविण्यात आले. मनोज उरकुडपारला पोहोचल्यानंतर गावालगत असलेल्या शेततळ्याजवळ भाऊ सिद्धार्थ व नातलगाच्या मदतीने मनोजच्या डोक्यावर व पोटावर धारदार शस्त्राने वार केला. यात मनोजचा मृत्यू झाला. त्याला फरपटत नेऊन झुडपात दडविण्याच्या प्रयत्न केला. माकडांना पळवून लावताना ही घटना ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. मृतक मनोजच्या बहिणीच्या बयानाच्या व तक्रारीच्या आधारे तांत्रिक आणि गुप्त माहितीच्या आधारावर पहाटे ६ वाजता संशयित महिला आरोपी प्रज्ञा बंडू गेडाम (३५) आणि तिचा भाऊ सिद्धार्थ लोखंडे (२२) यांना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. पुढील तपास ठाणेदार दिनेश लबडे, एएसआय सुधाकर माकोडे, वासु गेडाम, किशोर बोडे, कविता कुमरे, उज्ज्वला परचाके करीत आहेत. (प्रतिनिधी)
नातलगाच्या मदतीने काढला युवकाचा काटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2016 01:25 IST