दोषींवर कारवाई करा : पत्रकार परिषदेत चौकशीची मागणीपेंढरी (कोके) : येथून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या केवाडा (पेठ) (त. चिमूर) येथील रोजगार सेवक सशांक सोमेश्वर सहारे याने महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत लाखो रुपयांची अफरातफर करून भ्रष्टाचार केला आहे. सदर बाबीची प्रशासनाने चौकशी करून दोषींवर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.केवाडा (पेठ) ग्रामपंचायत अंतर्गत सन २०११ ते २०१६ या वर्षामध्ये मनरेगाचे काम करण्यात आले. या दरम्यान अंदाजे १५ लाख ५० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा अंदाज आहे. एप्रिल - मे २०१६ या कालावधीत सुरेश निकोडे ते रामभाऊ मोहुर्ले यांच्या शेतापर्यंत पांदन रस्त्याचे काम करण्यात आले. या कामावर काम करणाऱ्या मजुरांचे कमी काम दाखवून बोगस मजुरांच्या व बाहेरगावी असणाऱ्या मजुरांच्या नावे बोगस हजेरीपट तयार करून अंदाजे एक लाख ७५ हजार रुपये रोजगार सेवक सशांक सहारे याने हडप केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. सदर पांदन रस्त्याचे काम फक्त पाच हप्तेच करण्यात आले.सन २०१५-१६ या कालावधीमध्ये मनरेगा अंतर्गत धृपताबाई धोंडू चौधरी, भिकरू राघो बावणे, लक्ष्मण पत्रु दाते, झुनाबाई जांभूळकर, आशा पोईनकर या शेतकऱ्यांना शेततलाव मंजूर झाले. हे काम ठेका पद्धतीने १ लाख १० हजार ते १ लाख ३० हजार रुपये याप्रमाणे देण्यात आले.परंतु या कामात शेत तलावाच्या कामावर नसणाऱ्या व कधीही रोजगार हमीच्या कामावर न गेलेल्या मजुरांच्या नावे बोगस हजेरीपट तयार करून अंदाजे ८० हजार रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. पांदन रस्त्याच्या कामात बोगस स्वाक्षऱ्या मारून हजेरी लावण्यात आली व यात अंदाज चार लाख १७ हजार २५४ रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला. तसेच सन २०११ ते १६ मध्ये गटरोपवन अंतर्गत झालेल्या कामाचे ९० टक्के बोगस मस्टर तयार करून दोन लाख ९६ हजार १७ रुपयांचा गैरव्यवहार केला. बनावट बिले दाखवून पाच लाख ७९ हजार ३५० रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. जॉबकार्डासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडून ३ ते ४ हजार रुपये लुबाडण्यात आले. याबाबत माहितीच्या अधिकारात माहिती मागण्यात आली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधीला लेखी निवेदन देऊन दोषीवर कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी प्रदीप सोनुले (ग्रा.पं. सदस्य), मुर्लीधर गुरनुले, योगेश भेंडारे, नंदकिशोर सोनुले, हरेश पाटील व इतर गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. (वार्ताहर)
केवाड्याच्या रोजगार सेवकाने केली लाखोंची अफरातफर
By admin | Updated: August 26, 2016 01:00 IST