नवरगाव : शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस नवरगाव-नाचणभट्टी मार्गावर एका शेतामध्ये बस उलटली. या अपघातात २१ विद्यार्थी व पाच इतर प्रवासी जखमी असून सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही. सदर घटना सोमवारी सायंकाळी ५.४५ च्या सुमारास घडली.मानव विकास संसाधन मंडळाची चिमूर-नवरगाव-सिंदेवाही ही बस नवरगाव येथील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी नाचनभट्टी मार्गे जात असताना शिवटेकडी जवळील पुलाजवळ सुधाकर लांजेवार यांच्या शेतामध्ये उलटली. अपघात जखमी प्रवाशांना काही नागरिकांनी नवरगाव येथील डॉ. गिरडकर यांच्या खाजगी दवाखान्यामध्ये उपचारार्थ दाखल केले.बस कशामुळे उलटली हे गुलदस्त्यात असुन पुलावर दोन्ही भागाला उंचवटे असल्याने बस उसळून शेतात उलटली असावी, अशी चर्चा घटनास्थळावर होती. या अपघातात नैना गुरनुले, वैशाली खोब्रागडे, संयोगिता लोखंडे, काजल कामडी, मंजुषा बगडे, रागीना कामडी, अंजु मादाळे, शीतल लेंझे, प्रियंका जिबुडे, शुभांगी बगडे, कल्याणी गुरनुले, हर्षा बोरकर रा. मिनघरी, तेजस्वी श्रीरामे, निशिका कोल्हे, काजल बावणकर, सुकन्या चौधरी, अश्विनी मेश्राम, पौर्णिमा सावसाकडे, संगीता चौधरी, वैशाली चौधरी, आर्यन चौधरी सर्व नाचणभट्टी तसेच आतीश चौधरी, उरकुडाजी कोल्हे, संगीता चौधरी, वैशाली चौधरी, बायजाबाई चौधरी आदी प्रवासी जखमी झाले असून उपचार घेत आहेत.बसमध्ये २८ ते ३० विद्यार्थी मातोश्री विद्यालय नवरगाव, लोकसेवा विद्यालय नवरगाव व ५ ते ६ इतर प्रवासी होते. तुळशीदास शेणमारे हे बसचालक होते. तर वाहक म्हणून ए.बी. गजभे हे कार्यरत होते. अपघातात चालकाच्या मांडीला तर वाहकाच्या हाताला मार लागला आहे.चालकाकडून माहिती विचारली असता ‘स्टेअरिंग लॉक’ झाल्याने बसने उलटल्याचे सांगितले. घटनास्थळावर सिंदेवाहीचे ठाणेदार परघने आपला ताफा घेऊन पोहोचले. घटनास्थळावर बघ्याची मोठी गर्दी जमली होती. (वार्ताहर)
बस उलटली; २१ विद्यार्थी जखमी
By admin | Updated: March 17, 2015 00:58 IST