ब्रह्मपुरी : तालुक्यातील एस.पी. सोनकुसरे व आर.एस. बलावार या दोन तलाठ्यांसह नगर परिषदेचे कनिष्ठ अभियंता विजय शेंडे यांना लाचलुचपत प्रकरणात दोषी ठरवून सेवेतून बडतर्फ केल्याचे आदेश तहसील कार्यालय व नगर परिषदेला प्राप्त झाले आहे. उपविभागीय कार्यालयातील क्षेत्रामध्ये गोविंदपूर ता. नागभीड येथील एस.पी. सोनकुसरे या तलाठ्याने १३ नोव्हेंबर २०१३ ला ५०० रूपयांची लाच घेतली होती. अतिरिक्त जिल्हा न्यायालयात २०१४ मध्ये प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. त्यात त्यांना २८ नोव्हेंबरला दोषी ठरवून वरिल आदेशानुसार उपविभागीय कार्यालयाला पत्र प्राप्त होताच त्यांना बडतर्फ केले आहे. मौजा गिरगाव ता. नागभीड येथे आर. एस. बल्लावार हे कार्यरत असताना १५ जून १९९९ मध्ये १ हजार रुपये लाच घेताना सापडले होते. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. या प्रकरणात ८ सप्टेंबरला दोषी ठरवून आदेश पारीत करून वरिष्ठाच्या आदेशानुसार बडतर्फ केले आहे. आर. एस. बल्लावार हे ब्रह्मपुरी तालुक्यातील सुखोडी या गावात तलाठी पदावर कार्यरत होते. (प्रतिनिधी)
दोन तलाठ्यांसह कनिष्ठ अभियंता बडतर्फ
By admin | Updated: March 13, 2015 01:39 IST