विसापूर : देश स्वतंत्र करण्याच्या चळवळीत पत्रकारांची मोलाची भूमिका होती. पत्रकार बंधूंनी आपली रोखठोक मते वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडून देश जागृत केला. पत्रकारिता ही निर्भीड असली पाहिजे, असे प्रतिपादन मातोश्री वृद्धाश्रम येथे पत्रकार दिन कलागौरव महोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री शोभा फडणवीस यांनी व्यक्त केले.
मातोश्री वृद्धाश्रम भिवकुंड (विसापूर) येथे पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ तालुका शाखा बल्लारपूरच्या वतीने कलागौरव महोत्सव कार्यक्रम घेण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार मंगल जीवने व बल्लारपूर नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण वाघमारे यांनी आपापल्या क्षेत्रात मोलाचे कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ शाखा बल्लारपूरचे अध्यक्ष रमेश निषाद, उद्घाटक महिला काँग्रेस कमिटी (म.रा.)च्या प्रदेश सचिव रजनी हजारे, प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री शोभा फडणवीस, विशेष अतिथी जयस्वाल ज्येष्ठ व पत्रकार वसंत खेडेकर उपस्थित होते.
दरम्यान, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संचालन घनश्याम बुरडकर यांनी केले. प्रास्ताविक पद्माकर पांढरे यांनी केले. आभार अर्चना लाडसावंगीकर यांनी मानले.