चंद्रपूर : मागील उन्हाळ्यापासून इरई नदी स्वच्छता व खोलीकरणाला प्रारंभ करण्यात आला. चंद्रपूर शहरातून वाहणारी झरपट नदीचे सध्या वाटोळे झाले आहे. त्यामुळे आता झरपट नदीची स्वच्छता करून सौंदर्यीकरण केले जाणार आहे. ‘झरपट’ आता कात टाकणार आहे. या कामाचा शुभारंभ शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते भूमिपूजन करून झाला.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर वसंता देशमुख, प्राचार्य किर्तीवर्धन दीक्षित, सभापती संतोष लहामगे, अनिल फुलझेले, देवानंद वाढई, वनश्री गेडाम, मधुसूदन रुगंठा, सुरेश चोपणे, सुभाष कासनगोट्टूवार व विजय राऊत उपस्थित होते.केंद्र शासनाच्या नदी सौंदर्यीकरण व स्वच्छता अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील झरपट व इरई नदीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यावेळी सांगितले. नव्या वर्षाच्या मुहुर्तावर या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना अहीर यांनी केल्या. महाकाली यात्रेपूर्वी हे काम होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळाव्यात, या हेतूने सौंदर्यीकरण लवकर करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. झरपट नदी सौंदर्यीकरण करीत असताना हे ठिकाण नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनावे, यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले. पठाणपुरापासून डब्ल्यूसीएलपर्यंत झरपट नदीचे सौंदर्यीकरण केल्या जाणार आहे. नदीच्या दोन्ही बाजूला पायदळ वाट तयार करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. (शहर प्रतिनिधी)
‘झरपट’ही आता कात टाकणार
By admin | Updated: January 2, 2016 08:34 IST