चंद्रपूर : प पू. भीष्म पितामह सुमतीप्रकाशजी महाराज साहेबांचा ५० वा आयम्बिल तप महोत्सव, वाचनाचार्य प. पू. उपाध्याय विशालमुनीजी महाराज साहेबांचा सुवर्ण दीक्षा महोत्सव व प. पु. आशीषमुनीजी महाराज साहेबांना उत्तर भारतीय प्रवर्तकपदी विराजमान केल्याची घोषणा झाल्याच्या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून भारतात एकाच दिवशी अन्न्दान दिवस साजरा केला जातोय.
जिल्ह्यातील सकल जैन समाजाने शनिवारी चंद्रपुरात मातोश्री वृद्धाश्रमात सकाळचा पहिला चहा, नाश्ता, सकाळ व रात्रीचे भोजन, दुपारचा चहा अर्पण केला. डेबूजी सावली अन्तश्राम येथेही गुरुभक्त परिवाराकडून ही व्यवस्था करण्यात आली.
निराश्रित वृद्धांना संत्री, बिस्किट, फरसाण व काजुकतली वितरित करण्यात आली. दरवर्षी चंद्रपूर येथील १८ युवक मागील २० वर्षांपासून मांगलिक दर्शन सोहळा साजरा करतात. गुरू दर्शनासाठी गुरुमहाराज वास्तव्य ठिकाणी उपस्थित राहून गुरूदर्शन व सेवेचा लाभ घेतात. मात्र, यंदा कोरोना महामारी संकट आणि गुरूंच्या आदेशानुसार गुरू दर्शनासाठी न जाता शहरात ठिकठिकाणी सेवा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी दीपक पारेख, नरेश तालेरा, प्रशांत बैद, तुषार डगली, जितेंद्र मेहर, पप्पू सकलेचा आदींचे सहकार्य मिळत आहे.