केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल : चौकशीसाठी पथक दाखलबाळापूर : येथून जवळच असलेल्या सावरगाव येथील रोहयोंतर्गत मजुरांनी गावातील पांदण रस्त्याचे काम करूनही जवळपास ३०० मजुरांची सात दिवसांची मजुरीची रक्कम अडीच वर्षे होऊनही मिळालेली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे जिल्हा दक्षता समितीचे सदस्य तथा नागभीड तालुका भाजपाध्यक्ष होमदेव मेश्राम यांनी तक्रार केली होती. ‘लोकमत’नेही त्याचा पाठपुरावा केला होता. ‘लोकमत’चा संदर्भ देत ५ मार्च २०१५ च्या जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत मेश्राम यांनी मुद्दा उचलून धरला. या विषयावर दक्षता समितीचे अध्यक्ष, केंद्रीय मंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर, दक्षता समितीचे सदस्य यांच्यात तब्बल ४० मिनिटे चर्चा होऊन सावरगाव येथील मजुरांची मजुरी १५ दिवसांत देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एवढेच नव्हे, तर एक समिती गठित करून सावरगाव येथील कामाच्या संदर्भात तातडीने चौकशीसाठी पाठविण्यात आली.सदर चौकशी समिती ११ मार्चला सावरगावात दाखल झाली. या समितीत जिल्हाधिकारी, उपअभियंता आर.जी. वाघ, नायब तहसीलदार राजू यामावार, गटविकास अधिकारी (रोहयो) प्रणव बक्षी, कार्यक्रम व्यवस्थापक चंदू गोमासे, जिल्हाधिकारी कार्यालयातील सहायक लेखाधिकारी कल्पना वाडीघरे, नागभीडचे विस्तार अधिकारी आनंद नेवारे यांचा समावेश होता. या समितीकडून मंजूर गट प्रमुखांचे बयाण घेण्यात आले.यावेळी तत्कालीन शाखा अभियंता पी.जी. मेश्राम यांनी रोजगार सेवकाने मस्टर न ठेवल्यामुळे मजुरी मिळाली नाही. परंतु प्रत्यक्षात काम झाले असून यात कोणताही गैरव्यवहार झाले नसल्याची माहिती दिली. मेश्राम यांनी घेतलेल्या मोजमाप नोंदीवर प्रत्यक्ष काम झाले हे खरे आहे. तसेच मजुर गट प्रमुखांची नावे रेकॉर्डला नोंदविली असल्यामुळे मजुरांचा शोध घेणे सोपे झाले असल्याची माहिती उपअभियंता आर.जी. वाघ यांनी दिली. यामुळे दीर्घकाळ मजुरीपासून वंचित असलेल्या मजुरांची मजुरी मिळण्याची आशा आता पल्लवित झाली असून त्यामुळे मजुरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.मजुरांच्या गट प्रमुखांच्या समितीने उपस्थितांसमोर चौकशी करून मजुरांची नावे मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीचे सदस्य होमदेव मेश्राम, सावरगाव येथील सरपंच कल्पना पेंदाम, ग्रामसेविका प्रीती चिमूरकर, पोलीस पाटील मोरेश्वर ठिकरे, बोरकर व गावातील नागरिक सावरगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात उपस्थित होते. या कामावर जवळपास दररोज ३०० मजुरांनी काम केले असून अंदाजे २ लाख ५३ हजार ५७० रुपये मजुरी थकीत आहे. मात्र ही मजुरी देण्यासाठी यंत्रणेकडून चालढकल सुरू होती. (वार्ताहर)हजेरी रजिस्टर उपलब्ध नसल्यामुळे काम बंद केले होते. परंतु तत्कालिन सरपंच प्रविण खोब्रागडे यांच्या दबावामुळे पांदण रस्त्याचे काम करण्यात आले. मजुरांचे कच्चे हजेरी पत्रक रजिष्टरमध्ये तयार करून ठेवले. मला कामावरून कमी केल्यामुळे मी काम सोडताना सर्व रेकॉर्ड ग्रा.पं. ला जमा केला आहे.- तुलीपचंद गेडाम, तत्कालीन रोजगारसेवकपी.जी. मेश्राम शाखा अभियंता यांनी घेतलेल्या मोजमाप रेकॉर्डच्या नोंदीवरून गट प्रमुखांची नावे कळणे सोपे झाले व त्यावरून कामावर असलेल्या मजुरांची ओळख पटविता येईल. सदर नोंदीवरून पांदण रस्त्याचे काम झाले हे सत्य आहे. मात्र मजुरांचे हजेरी बुक उपलब्ध नसल्याने मजुरी देण्यास विलंब झाला आहे.- आर.जी. वाघ, उपअभियंता, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूररोजगार सेवकांने हजेरी रजिस्टर न ठेवल्यामुळे मजुरांची मजुरी मिळण्यास विलंब झाला. मजुरांचे हजेरी बुक ठेवणे हे रोजगार सेवक व ग्रामसेवकाची जबाबदारी आहे. मात्र ते ठेवण्यात आले नाही. मी प्रत्यक्ष झालेल्या पांदण रस्त्याच्या कामाचे मोजमाप घेवून रेकॉर्डची नोंदणी केली आहे.- पी.जी. मेश्राम, तत्कालिन शाखा अभियंता, नागभीड.
सावरगाव येथील ३०० मजुरांच्या मोबदल्याचा प्रश्न ऐरणीवर
By admin | Updated: March 14, 2016 00:49 IST