घोसरी : पोंभुर्णा तालुक्यातील चेकआष्टा येथील पुरुषोत्तम उद्धव मडावी (५२) हे तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता, अचानक त्यांच्यावर वाघाने हल्ला चढविला. यामध्ये ते जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र.९६ या राखीव जंगलात उघडकीस आली.
पुरुषोत्तम हा चेकआष्टा तलावावर बैलांना पाणी पाजण्यासाठी दोन सहकाऱ्यांसोबत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास गेला होता, परंतु पुरुषोत्तम मडावी हा अचानक गायब झाला होता. तो घरी परतलाच नाही. रात्रीला त्याच्या नातेवाइकांसह व गावकऱ्यांनी आजूबाजूचा परिसर व जंगल पिंजून काढले. मात्र, शोध लागला नाही. पुन्हा शुक्रवारी सकाळी गावकऱ्यांसह वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली असता, चिंतलधाबा बिटातील कक्ष क्र. ९६ या राखीव जंगलात पुरुषोत्तमचा मृतदेहच आढळला. घटनास्थळाच्या अवलोकनावरून पुरुषोत्तम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी खोब्रागडे, सहायक वनसंरक्षक कोडापे, वनक्षेत्र अधिकारी यादव, वनरक्षक आर.जी. मेश्राम, ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच कांताबाई मडावी, उपसरपंच जगन येलके, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष देवराव कडते उपस्थित होते. मृतकाच्या परिवाराला वनविभागाकडून तातडीची आर्थिक मदत देण्यात आली. मृतकाच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी आहे. मृतकाच्या एका वारसाला नोकरी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.