स्वीच खोलीला पडल्या भेगा : २१ लाख रुपयांचा खर्च पाण्यातमूल : शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असेल त्यावेळी त्यांना पाणीपुरवठा करता यावा, यासाठी उपसा जल सिंचन योजनेअंतर्गत मूल तालुक्यातील दहेगाव-मानकापूर परिसरातील नदीवर २१ लाख रुपये खर्च करुन विहीर बांधण्यात आली. मात्र अल्पवधीतच ती विहीर कोसळली असून जवळच बांधलेल्या स्विच खोलीला सुद्धा भेगा पडल्या आहेत. जिल्हा परिषद सिंचाई उपविभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी मुकावे लागत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून केला जात आहे. शेतकऱ्यांना वरदान ठरु पाहणारी उपसा जल सिंचन योजना जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग मूल अंतर्गत सन २००९-१० या वर्षात मंजूर झाली. त्यानंतर कामाला सुरुवात झाली. मूल तालुक्यातील दहेगाव-मानकापूर परिसरातील गावातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार होता. २५ लाख रुपयाची ही जल सिंचनाची योजना असताना नदीत पाण्याची टाकी व जवळच स्विच खोली बांधण्यासाठी संबंधीत कंत्राटदाराने २१ लाख रुपये खर्च केले. बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याने एक-दोन वर्षातच सदर विहिर कोसळून काही भाग पाण्यातच दबल्या गेला. यासंदर्भात शेतकऱ्यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर घटनास्थळी सिंचाई विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे, तत्कालीन उपविभागीय अभियंता वालदे यांनी पाहणी केली. मात्र कार्यवाहीचे काय झाले? याबाबत शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळावे यासाठी २५ लाख रुपयाची जल सिंचनाची योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र अधिकारी व कंत्राटदाराने संधान साधून चांगल्या योजनेला काळीमा फासल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत सखोल चौकशी करुन कार्यवाही करावी व शेतकऱ्यांना लाभ मिळेल अशी योजना कार्यान्वीत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)शेतकऱ्यांना वरदान ठरु पाहणारी जलसिंचनाची योजना दहेगाव, मानकापूर परिसरात मंजूर करण्यात आली. मात्र संबंधीत कंत्राटदार व तत्कालीन उपविभागीय अधिकारी नोमूलवार यांच्या संगनमताने चांगल्या योजनेचे तीन तेरा वाजविले. या योजनेवर २१ लाख रुपये खर्च केल्यानंतर अल्पावधीतच नदीत बांधलेली विहिर कोसळली. तसेच स्विच रुमला भेगा गेल्या. यावरुन बांधकाम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे कंत्राटदार व अभियंता कारवाई होणे गरजेचे आहे. - वर्षा परचाके, सदस्या, जि.प. चंद्रपूर.
सिंचन विहीर अल्पावधीतच कोसळली
By admin | Updated: March 18, 2016 01:01 IST