भद्रावती : येथील हार्डवेअरमधील व दोन वेगवेगळ्या बँकात चोरीच्या घटना घडल्या. याबाबत भद्रावती पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी नव्यानेच लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आंतरराज्यीय चोरट्याला गजाआड केले. गांधी चौकातील श्रीहरी पाम्पट्टीवार यांच्या दुकानाच्या काऊंटरवरून १ लाख १५ हजाराची बॅग तसेच ४ फेब्रुवारीला लक्ष्मण महाजन यांनी बँक आॅफ इंडिया येथून काढून गाडीच्या डिक्कीत ठेवलेले २७ हजार रुपये व याच दिवशी पराग अवतरे पांडव वॉर्ड यांनी ब्रह्मपुरी अर्बन बँकेतून काढलेले ३५ हजार अशी एकुण एक लाख ६४ हजार रुपये लंपास करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. येथील ठाणेदार अशोक साखरकर यांनी चोरीचे तपासचक्र जोराने फिरवून या दोन्ही बँकेतील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्याचा शोध घेतला व संशयितांनी घातलेला निळा चेकचा शर्ट व पांढरा फुलपॅन्ट घातलेला इसम दोन्ही बँकेच्या अवतीभोवती दिसत होता. त्यानंतर ११ फेब्रुवारीला आठवडी बाजाराच्या दिवशी बँक आॅफ इंडियाजवळ पोलिसांनी लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून लक्ष ठेवून दोन पोलिसांची वेगवेगळी पथके ठेवण्यात आली. तोच संशयित पुन्हा कॅमेऱ्यासमोर येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॉकीटमध्ये कर्नाटक राज्यातील मोटर परिवहन विभागाचा परवाना व वोटींग कार्ड प्राप्त झाले. त्यावर त्याचे नाव रामू पकीरप्पा शेरपंजी जि. शिमागा राज्य कर्नाटक असे असल्याचे निष्पन्न झाले. (शहर प्रतिनिधी)
आंतरराज्यीय चोरटा पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: February 15, 2015 00:45 IST