सावली पोलिसांची कारवाई : तीन ट्रक जप्त करून दंड ठोठावला सावली : सावली पोलीस ठाण्याचे कर्मचारी गस्तीवर असताना पहाटे ४.३० वाजताच्या सुमारास तेलंगाना राज्यात रेतीची अवैध वाहतूक करीत असताना तीन ट्रक पकडले. त्यात महसूल विभागाने एक लाख १८ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. हरणघाट जि. गडचिरोली येथून वैनगंगा नदीच्या घाटातून रेतीची आंतरराज्यीय तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे सावली पोलिसांनी सापळा रचून सदर कारवाई केली. त्यात ट्रकचे चालक प्रेमकुमार कांबळे रा. घाटीपार ता. उतनूर जि. अदिलाबाद, रामराव हरिश्चंद्र रायगुडे रा. इंद्रैली ता. उतनुर जि. अदिलाबाद, संग्राम सिताराम केंद्र रा. विचोडा ता. संग्राम जि. अदिलाबाद यांच्याकडून तीन ट्रक ताब्यात घेतले. एपी ०१ एक्स ३५५३, एपी ०१ एक्स ३५४०, एपी०१ एक्स ६४५३ असे ट्रक क्रमांक आहेत. रेती वाहतूक परवान्यामध्ये खोडतोड व तारीख लिहलेली नसल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी ट्रक ताब्यात घेतले. महसूल विभागाने महाराष्ट्र जमीन गौण खनिज नियम १९६६ चे कलम ४८(७) सुधारणा पोट कलम (८) (२) अन्वये प्रत्येकी पाच ब्रास याप्रमाणे १५ ब्रास रेतीच्या अवैध वाहतुकीवर १ लाख १८ हजार ५०० रुपयाचा दंड ठोठावला आहे. आंतरराष्ट्रीय रेती तस्करांना पकडण्याची पहिलीच वेळ असून यापूर्वी अशा प्रकारची कारवाई झालेली नाही, हे विशेष ! (तालुका प्रतिनिधी)
आंतरराज्यीय रेती तस्कर पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Updated: July 22, 2016 01:07 IST