आढावा बैठक : केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्याची उपस्थितीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या योजनेतून नामांकीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. अनेक शाळांमध्ये सुविधा नसताना नामांकित शाळेच्या नाववर आदिवासी विभागाची लूट करीत आहेत. त्यामुळे या नामांकित शाळांमध्ये उपलब्ध सोई-सुविधांची वेळोवेळी तपासणी करण्याचे निर्देश केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये इवनाते यांनी आदिवासींच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणाऱ्या नामांकित शाळांचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला आला. यावेळी इवनाते यांनी इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो, त्या शाळांची वेळोवेळी प्रकल्प कार्यालयातर्फे तपासणी करण्यास सांगितले. या नामांकित शाळांमध्ये मुलांना मिळणाऱ्या सोई सुविधांचीसुध्दा वारंवार तपासणी करण्यात यावी. तसेच ज्या अन्य शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते, तेथील गुणवत्ता कशी आहे, याची तपासणी प्रत्येक महिन्याला करण्यात यावी. मुलांच्या अडीअडचणी व पालकांची गाऱ्हाणी संबंधित प्रकल्प कार्यालयाव्दारे त्या संस्थेच्या लक्षात आणून देण्याचे काम करावे. त्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण जाणार नाही. त्यांचे शिक्षण उत्तम होईल, याकरिता प्रयत्न करण्यात यावे, असेही त्यांनी बजावले.जिल्हयातील अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवाना केंद्र व राज्य सरकारतर्फै विविध योजनामधून निधी पुरविण्यात येत असतो. त्या विविध योजनांच्या माध्यमातून आदिवासी समाजातील नागरिकांना सर्व मुलभूत सोई सुविधा पुरविण्यात याव्यात. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने काम करावे, असेही निर्देश इवनाते यांनी दिले. चंद्रपूर जिल्हयातील अतिदुर्गम भागातील आदिवासी नागरिकांना आदिवासी विभागातर्फे राबविण्यात येणा-या विविध योजनांचा लाभ देतांना त्यांचे अर्ज मुख्यालयात सादर करण्याचे निर्देश न देता त्या- त्या तालुक्यातील आश्रमशाळेत अथवा शासकीय वसतिगृहात स्वीकारण्यात यावे. त्यांच्यामार्फतच लाभार्थ्यांना विविध वस्तुंचा पुरवठा केला जावा, अशा सूचना इवनाते यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.या बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी एम.आर. दयानिधी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
नामांकित शाळांची तपासणी करण्याचे निर्देश
By admin | Updated: May 28, 2017 00:44 IST