चंद्रपूर : आरोग्य सेवेतील कोरोना योद्ध्यांकरिता जिल्ह्यात दाखल झालेल्या कोविशिल्ड लस साठ्याची आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी पाहणी केली. २१ हजार लसीचे डोज जिल्हा परिषद आवारातील औषधी भांडारच्या शितकक्षामध्ये ठेवण्यात आल्या आहेत. लस सुरक्षित ठेवण्यात आल्याचे पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी त्यांनी या कोरोना लसबाबत जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड व जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांचेकडून माहिती घेतली. जिल्ह्यात उद्या चंद्रपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रामनगर व पठाणपुरा आरोग्य केंद्रात तसेच वरोरा, ब्रम्हपुरी व राजुरा येथील सहा केंद्रांवर लसीकरण होणार आहे. यावेळी आरोग्य सेवेतील नऊ हजार लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोज देण्यात येणार असून पहिला डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांनाच २८ दिवसानंतर दुसरा डोज देण्यात येणार आहे.