दोषींवर कारवाईचे संकेत : वणव्यामुळे आग लागल्याची शक्यतावरोरा : वनपरिक्षेत्र वरोरा अंतर्गत येणाऱ्या टेमुर्डा उपवनक्षेत्रातील जंगलात १४ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. या आगीत नर्सरी व २५ हेक्टरमधील जंगल जळून खाक झाल्याने वनविभागाचे मोठे नुकसान झाले. या आगीची चौकशी करण्याकरिता वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावर दाखल होवून पाहणी सुरू केली आहे. यामध्ये दोषी असल्यावर कार्यवाहीचे संकेत सुत्रांकडून मिळाले आहे.वरोरा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या टेमुर्डा उपवनक्षेत्रातील केम सुमठाना गावाच्या नजीकच्या जंगलात १४ एप्रिल रोजी दुपारी आग लागली. दुपारी वारा असल्याने जंगलातील आग सुमठाना व केम गावाच्या दिशेने येत असल्याचे बघत दोन्ही गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व आग आटोक्यात आणली. त्यामुळे सुमठाना व केम गाव आगीपासून बचाविल्याचे मानले जात आहे. आगीमध्ये २५ हेक्टर परिसरात वन विभागाची रोप वाटीका होती. या रोप वाटीकेतील रोपेही जळून खाक झाल्याने वनविभागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही रोपे पावसाळ्यात ज्या ठिकाणी लावण्यात येणार होते, त्याचे नियोजनही ढासळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आगीमध्ये मनुष्य व वन्यप्राण्यांना कुठलीही इजा झाली नसल्याची माहिती आहे. जंगलानजीक असलेल्या शेतात वनवा लावल्याने आग जंगलातील रोप वाटीकेच्या परिसरात लागल्याची शक्यता वर्तविली जात असून वनकर्मचारी व सुमठाना, केम गावातील नागरिकांच्या सर्तकतेने मोठी टळली. (तालुका प्रतिनिधी)वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून आगीची चौकशी सुरू केली आहे. या चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कडक कार्यवाही केली जाईल. - संतोष औतकर, वनपरिमंडळ अधिकारी, टेमुर्डा उपवनक्षेत्र.
जंगलातील आगीची चौकशी सुरू
By admin | Updated: April 16, 2016 00:41 IST